मंत्री यशोमती ठाकूर यांनी 800 कोटींचा घोटाळा केला, नवनीत राणा यांचा गंभीर आरोप
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा केला, असा खळबळजनक आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी याप्रकरणी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे. उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंत्राटदाराला बालकांच्या पौष्टिक आहाराचा ठेका दिल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांचा पलटवार
नवनीत राणा यांच्या गंभीर आरोपांवर यशोमती ठाकूर यांनी फेसबुक लाईव्ह येत याप्रकरणावर खुलासा केला आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा आणि अंगनवाडीताईचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे, असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. त्यामुळे आता अमरावतीत यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे.
यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महिला व बालसिकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘राज्य सरकारच्या कार्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं’
“कुपोषणाच्या विरोधात मी मंत्री झाल्यापासून व्यापक चळवळ हाती घेण्यात आली. सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र अशी घोषणा देऊन राज्य सरकारने जे काम केलं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः पहिल्या क्रमांकाचं बक्षिस देऊन गौरवलं आहे. तरी सुद्धा एकही बालक कुपोषित राहता कामा नये म्हणून आपण पोषण अभियानाची जनजागृती चळवळ वर्षभर राबवत आहोत. कोविड काळातही कड्याकपाऱ्यातून अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका दुर्गम भागात जाऊन पोषण आहार पोचवत आहेत. मेळघाटात मी स्वतः अनेक दौरे केले आहेत. तिथे मुक्काम करून सर्व यंत्रणा कशी जोमाने काम करेल यासाठी प्रयत्न केले आहे”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
‘फक्त चमकोगिरी करायची यासाठीच नवनीत राणा यांचा सगळा आटापिटा’
“मेळघाटातील कुपोषणाचा विषय अतिशय संवेदनशील आहे. पण आज चमकोगिरी करत आदिवासी भागात फक्त फोटसेशन आणि क्रिकेट खेळायला जाणाऱ्या नवनीत राणा यांनी सर्व आदिवासी समाज, अमरावतीकर यांचा अपमान केला आहे अशी टिका ही त्यांनी यावेळी केली.
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही बालमृत्यूंचं प्रमाण कमी येऊ शकलं नव्हतं. आता ज्या 49 बालमृत्यूच्या बातम्या येत आहेत त्याप्रकरणात शासनाने याआधीच उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे. फक्त चमकोगिरी करायची यासाठीच नवनीत राणा यांचा सगळा आटापिटा असल्याचं दिसतंय, असा घणाघात ठाकूर यांनी केला.
‘नवनीत राणा यांनी माफी मागावी’
खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आलंय असा सवाल ही अँड यशोमती ठाकूर यांनी केला आहे. कुठल्या कंत्राटदारांसाठी हा आटापिटा सुरूय? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या निकषांच्या आधारे पोषण आहाराचं काम देण्यात आले होते, कोविडमुळे काम ठप्प पडू नये म्हणून तीच रचना कायम ठेवण्यात आली होती. कोविड काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका आणि समस्त अमरावतीकरांचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाले ते बघा :
हेही वाचा : संजय राठोडांच्या अडचणीत वाढ, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार