नाला साफ करताना कार अंगावर आली, मजूर नाल्यात पडला अन्…
सध्या पावसाळा सुरु झाल्याने नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. मात्र हे काम करताना कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेत नसल्याचे दिसून येते.
मुंबई : नाला साफ करणाऱ्या कामगाराने कारने धडक दिल्याने कामगाराचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली आहे. ही खळबजनक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. संविदा श्रमिक जगवीर शामवीर यादव असे 37 वर्षीय मयत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कार चालक आणि संबंधित कंत्राटदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. नालेसफाई करत आवश्यक ती सुरक्षेची काळजी न घेतल्याने ही घटना घडली आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा कामगाराच्या जीवावर बेतला आहे.
काय आहे प्रकरण?
कांदिवलीतील धनुकवाडी परिसरात नालेसफाईचं काम सुरु होतं. एक मजूर नाल्यात उतरुन कचरा भरत होता, तर त्याचे साथीदार कचरा फेकत होते. नाल्यात उतरलेला मजूर नाल्यातून बाहेर येत होता इतक्यात समोरुन आलेली भरधाव कार त्याच्या अंगावर गेली. यात तो नाल्यात पडला आणि जखमी झाला. त्याला तात्काळ जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सर्व घटना सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर पोलिसांनी कार चालकासह कंत्राटदाराला अटक केली आहे. निष्काळजीपणाचा ठपका कंत्राटदारावर ठेवण्यात आला आहे.
गोवंडीत शिवार लाईनची साफसफाई करताना दोघांचा मृत्यू
गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी गटार साफ करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आज कांदिवलीत नाला साफ करताना कामगाराच्या मृत्यूची घटना घडली. रस्ता क्रमांक 10 वरील गटाराची सफाई कामगाराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पालिका आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शिवर लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस असल्याने गुदमरुन या दोघांचा मृत्यू झाला.