महाराज आणि स्वयंपाक्याने डाव साधला, घरातील ड्रॉव्हरमधून तब्बल 27 लाखांचं…
मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. नवीन वर्षातही अनेक गुन्हे समोर येत आहेत. दक्षिण मुंबईमधून अशीच एक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईमधील कारमाइकल रोड येथे एका गुंतवणूकदाराने गावदेवी पोलिसांत धाव घेतली

मुंबई | 5 जानेवारी 2024 : मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. नवीन वर्षातही अनेक गुन्हे समोर येत आहेत. दक्षिण मुंबईमधून अशीच एक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईमधील कारमाइकल रोड येथे एका गुंतवणूकदाराने गावदेवी पोलिसांत धाव घेतली आहे. त्याच्या आईने वाढदिवसानिमित्त दिलेले 27 लाख रुपये किमतीचे मौल्यवान घड्याळ गहाळ झाल्याने त्यान गुंतवणूकदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सिद्धार्थ सोमय्या (वय 34) असे तक्रारदार इसमाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सोमय्या याच्या घरात काम करणारा कूक (स्वयंपाकी) आणि त्याच्यासोबत काम करणारा महराजा यांचा यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिस स्टेशनमधील अधिकारी अधिक तपास करत आहेत.
गावदेवी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सोमय्या हा दक्षिण मुंबईतील एका इमारतीमध्ये 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. एका खोलीत त्याची आई, दुसऱ्या खोलीत तो (सिद्धार्थ) आणि तिसऱ्या खोलीत त्यांच्याकडे घरकाम करणारी मदतनीस ही राहते. तर कूक (स्वयंपाकी) मुरारी शालिग्राम सूर्यवंशी हा (वय 45) जेवण बनवतो आणि स्वयंपाक करून झाल्यानंतर तो घरी जातो.
सिद्धार्थच्या आईने त्याला वाढदिवसानिमित्त पॅटेक फिलिप स्टेनलेस स्टील एक्वानॉट रिस्टवॉच हे 27 लाख रुपये किमतीचे घड्याळ गिफ्ट दिले होते. ते घड्याळ सिद्धार्थ हा त्याच्या बेडरूममधील कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवायचा. 31 डिसेंबर रोजी सिद्धार्थ सोमय्या हा घरी होता, तेव्हा काही कामानिमित्त तो बेडरूममध्ये गेला. तेव्हा त्याला तेथील ड्रॉवरमधून त्याचे घड्याळ हरवल्याचे लक्षात आले. त्याने बरीच शोधाशोध केली, पण घड्याळ काही सापडलं नाही. त्याने सर्वांकडे चौकशी केली. कूक सूर्यवंशी याच्याकडेही विचारणा केली, मात्र त्याने काही योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळै सिद्धार्थ याचा संशय बळावला.
त्यानंतर सिद्धार्थने सीसीटीव्ही फूटेज चेक केले असता, कूक सूर्यवंशी हा इमारतीमधील बाहेर पडला आणि कोणालातरी भेटल्याचे, त्यात आढळले. सिद्धाऱ्थने त्याबद्दलही सूर्यवंशी यांना प्रश्न विचारले, पण त्यांनी काहीच समाधानकारक उत्तरे दिली नाही आणि सिद्धार्थचा संशय आणखीनच बळावला. अखेर सिद्धार्थने गावदेवी पोलिसांत धाव घेत २७ लाखांचे घड्याळ गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. सोमय्याच्या तक्रारीच्या आधारे, मुरारी शालिग्राम सूर्यवंशी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ३८१ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ठोस पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस जोमाने कामाला लागले असून अधिक तपास शुरू आहे.