Mumbai Accident : फायर ब्रिगेडच्या मॉक ड्रिलदरम्यान विचित्र अपघात; माटुंग्यातील घटनेत 3 जवान गंभीर जखमी
आग विझवण्याचे कार्य चालू असतेवेळी पाण्याचा पंप चालवताना एका मर्यादेपेक्षा जास्त इंजिनचा वेग वाढविल्यास गिअर बॉक्स ड्राइविंग मोडमध्ये जातो. अशावेळी यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे जाते. आज माटुंगा येथेही अशाच प्रकारे यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे गेल्याने अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : माटुंगा पूर्वेकडे मॉक ड्रिल(Mock Drill)दरम्यान झालेल्या विचित्र अपघातात मुंबई अग्निशमन दला(Fire Brigade)चे तीन जवान गंभीर जखमी झाले. शनिवारी माटुंग्यातील भाऊ दाजी रोडवरील श्रीनिधी अपार्टमेन्टमध्ये मॉक ड्रिल सुरु होते. यावेळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांमध्ये चेंगरून गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सायन रुग्णालया(Sion Hospital)त हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. निवृत्ती सखाराम इंगवले, चंचल भिमराव पगारे आणि सदाशिव धोंडीबा कर्वे अशी जखमी झालेल्या जवानांची आहेत. या तिघांपैकी एका जवानाचा उजवा पाय कापून काढावा लागला. (3 seriously injured in fire brigade accident in Matunga during mock drill)
यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे गेल्याने अपघात
MAN या जर्मन कंपनीच्या ओरिजिनल गिअर बॉक्स असणाऱ्या गाड्यांना Allison या अमेरिकन कंपनीचे ॲाटोमेटीक गिअर बॉक्स बसवून सदर गाड्या अग्निशमन दलामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आग विझवण्याचे कार्य चालू असतेवेळी पाण्याचा पंप चालवताना एका मर्यादेपेक्षा जास्त इंजिनचा वेग वाढविल्यास गिअर बॉक्स ड्राइविंग मोडमध्ये जातो. अशावेळी यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे जाते. आज माटुंगा येथेही अशाच प्रकारे यंत्र चालकाशिवाय गाडी पुढे गेल्याने अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे.
MAN गाडीची जम्बो टँकरला धडक
बृहन्मुंबई महापालिकेच्या एफ/उत्तर विभागात मॉक ड्रिल चालू असताना MAN ही गाडी यंत्रचालकाशिवाय चालू झाली. त्यामुळे ती गाडी पुढे गेली आणि समोरील जम्बो टॅंकरला धडकली. त्यावेळी तेथे कर्तव्य बजावत असलेल्या यंत्र चालक निवृत्ती सखाराम इंगवले यांच्यासह चंचल भिमराव पगारे आणि सदाशिव धोंडीबा कर्वे हे तिघे जवान दोन्ही गाड्यांमध्ये चिरडून गंभीर जखमी झालेत. त्यांना पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांपैकी एका जवानाचा उजवा पाय कापून काढावा लागला आहे, असे बहुजन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजय कांबळे-बापेरकर यांनी सांगितले.
या विचित्र अपघातामागील कारणाचा शोध घेतला जात असून अपघाताला नेमकी कोणाची चूक कारणीभूत ठरली, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र अशा घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेतली पाहिजे आणि जे कर्मचारी जखमी झाले आहेत, त्यांना योग्य ती भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बहुजन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजय कांबळे – बापेरकर यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. (3 seriously injured in fire brigade accident in Matunga during mock drill)
इतर बातम्या
Mumbai Gold Return : तब्बल 22 वर्षांनंतर मिळवले चोरीचे सोने, मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी