सत्य पण रंजक कहाणी | मुंबईत तिने नवऱ्याला वश (नवऱ्यावर कंट्रोल) करण्यासाठी ज्योतिषाला दिले 59 लाख, माजी प्रेमीही सहभागी
पतीला आपल्याकडे वश करुन घेण्यासाठी पत्नीने ज्योतिषाला तब्बल 59 लाख रुपये दिल्याची धक्कादायक घटना मुंबईतील हायप्रोफाईल पवई परिसरात उघडकीस आली आहे.
मुंबई : पती केवळ आपला भाऊ आणि कुटुंबीयांचेच ऐकत असल्याने पत्नी हतबल झाली होती. यातूनच पतीला आपल्याकडे वश करुन घेण्यासाठी पत्नीने ज्योतिषाला तब्बल 59 लाख रुपये दिल्याची धक्कादायक घटना मुंबईतील हायप्रोफाईल पवई परिसरात उघडकीस आली आहे. ही घटना उघड होतात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी महिलेचा जुना प्रियकर आणि ज्योतिषाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती एक उद्योजक आहे. 13 वर्षांपूर्वी महिलेच्या पतीला तिच्या आधीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली होती. तेव्हापासून पती-पत्नीमधील संबंध बिघडले आहेत. पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर या जोडप्यामध्ये वारंवार भांडणं होत असतं.
महिलेचा पती आपला भाऊ आणि कुटुंबीयांचेच केवळ ऐकायचा. या सर्वामुळे महिला हैराण झाली होती. त्यामुळे तिला आपल्या पतीला वश करायचे होते. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती ज्योतिष बादल शर्मा याला भेटली.
या ज्योतिषाने महिलेला सांगितले की, तो काळी जादू करुन तिच्या पतीला वश करेल. यासाठी महिलेचा जुना प्रियकर परेश गडा याने ज्योतिषाची मदत केली. 13 ते 18 ऑक्टोबरच्या दरम्यान ही घटना घडली.
पतीने कामगारांचे पगार देण्यासाठी लॉकरमध्ये ठेवलेली 35 लाख रुपयांची रोकड आणि 24 लाखांचे दागिने महिलेने ज्योतिषाला पतीला वश करण्यासाठी दिले.
अशी उघडकीस आली घटना
महिलेचा पती उद्योजक असल्याने त्याने कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी घरी 35 लाख रुपयांची रोकड आणून ठेवली होती. जेव्हा कामगारांचे पगार देण्याची वेळ आली तेव्हा पतीने रोकड काढण्यासाठी लॉकर उघडले तर त्यात पैसे नव्हते.
पतीने महिलेला याबाबत विचारले तर तिने काहीच सांगितले नाही. बराच प्रयत्न करुन पती आणि दिराने महिलेला विश्वासात घेऊन विचारणा केली असता सर्व प्रकार महिलेने सांगितला. हे ऐकताच पतीच्या पायाखालची जमिनच सरकली.
आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पतीने तात्काळ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ज्योतिष बादल शर्मा आणि महिलेचा जुना प्रियकर परेश गडा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दोघेही आरोपी सध्या फरार असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.