Mumbai Crime : मुंबईतील ‘हे’ ठिकाण महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक, गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
मुंबईचे फुफ्फुस असणारे आरेचे जंगल सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई / 24 जुलै 2023 : रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून प्रत्येकाला कुठेतरी जंगलातील हिरवळीत फिरावे वाटते. मुंबईकरांसाठी शहरामध्ये असलेले आरे जंगल म्हणजे पर्वणीच समजली जाते. पण मुंबई शहराचं फुफ्फुस असणारं हे आरेचं जंगल अत्याचाराच्या घटनांमुळे सध्या चर्चेत आलं आहे. रस्त्यांवरील दिव्यांचा अभाव, माणसांची दुर्मिळ वर्दळ यामुळे महिलांवरील अत्याचारासाठी गुन्हेगारांसाठी हे मोक्याचं ठिकाण ठरतंय. यामुळे आरेमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, गुन्हेगारीला आळा घालण्याचे सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर उभं आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनांचा मोठा अभाव
आरेमधील महिलांवरील वाढते गुन्हे पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एवढ्या विस्तीर्ण आरे परिसरात केवळ एक पोलीस चौकी आहे. आधीच घनदाट जंगल त्यात रस्त्यांवर पथदिव्यांचा अभाव यामुळे अंधाराचा फायदा घेत गुन्हेगार सहज पळून जातात. तसेच पोलीस ठाण्याचा परिसर वगळता इतरत्र कुठेही सीसीटीव्ही नाहीत, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नाही. यामुळे गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
आरेतील अंतर्गत रस्त्यांवर या अत्याचाराच्या घटना घडतात. यामुळे आरेच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, नियंत्रण कक्ष उभारावे, तसेच पथदिवे बसवण्यात यावे अशी मागणी संरक्षणवाद्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. या परिसरातील कुणीही स्थानिक किंवा आदिवासी लोक यांचा या गुन्हेगारीत सहभाग नसतो. गुन्हेगार येथे बाहेरुन येतात. तसेच वाढते अतिक्रमण हा देखील एक गंभीर मुद्दा असून, यासाठी वनरक्षकांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.