दाऊद इब्राहिमचा हस्तक रियाज भाटीला अखेर बेड्या, न्यायालयाने ‘या’ प्रकरणात सुनावली पोलीस कोठडी
रियाज भाटीला खंडणी, जमीन हडपणे, गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही अटक करण्यात आली होती.
मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : एका खंडणी (Extortion) प्रकरणात पोलीस शोध घेत असलेला दाऊदचा हस्तक रियाज भाटी (Riyaz Bhati)ला अखेर मुंबई पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. भाटीला आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आला. यावेळी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने भाटीला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.
भाटीचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगण्यात येत असून वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात तो हवा होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रियाज भाटीला खंडणी, जमीन हडपणे, गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण ?
दाऊदचा अन्य एक हस्तक आणि रियाज भाटीचा साथीदार सलीम फ्रुट मुंबईतील एका व्यावसायिकासोबत 62 लाख जुगारात जिंकला होता. मात्र जिंकलेले पैसे त्याला त्या व्यावसायिकाकडून मिळत नव्हते. यासाठी तो त्या व्यावसायिकाकडे वारंवार पैशाचा तगादा लावत होता.
व्यावसायिकाने पैसे न दिल्याने सलीम त्याची कार घेतली. या कारची किंमत त्याने 30 लाख रुपये लावली. यानंतर उर्वरीत 32 लाख रुपयांची मागणी तो व्यावसायिकाकडे करत होता.
दरम्यान, टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने सलीम फ्रुटला अटक केली. सलीम सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. सलीमच्या अटकेनंतर त्याचा साथीदार रियाज भाटी 32 लाख वसुल करण्यासाठी सदर व्यावसायिकाला धमकावत होता.
पोलिसांकडून 14 दिवसांच्या कोठडीची मागणी
पोलिसांनी पुढील चौकशीकरीता रियाज भाटीची 14 दिवसाची पोलीस कोठडी मागतली होती, मात्र मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत भाटीला पोलीस कोठडी दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांची पूर्ण रिमांड सलीम फ्रुटविरोधात आहे. खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस एनआयएकडून सलीमची कस्टडी घेऊ शकतात. त्यांना भाटीच्या कोठडीची काय गरज आहे? असा प्रश्न देखील रियाझ भाटीच्या वकिलांकडून पोलिसांना करण्यात आला आहे.
यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस सलीम फ्रुटच्या कस्टडीची मागणी एनआयएकडे करण्याची शक्यता आहे.