ऑनलाईन साईटवर मसाजर शोधत होता, मात्र समोर जे दिसले ते पाहून पायाखालची जमिनच सरकली
जाब विचारताच रेशमा यादवने त्या दोघींसोबत भांडण करण्यास सुरुवात केली आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र तिघांनी तिला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुंबई : शहरातील खार परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुंदर महिलांचे फोटो एस्कॉर्ट आणि मसाज साईटवर टाकणाऱ्या महिलेला खार पोलिसांनी अटक केली आहे. रेशमा यादव असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. खारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपली पत्नी आणि बहिणीचा फोटो एस्कॉर्ट साईटवर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
खारमध्ये राहणारा एक व्यक्ती ऑनलाईन साईटवर मसाजर शोधत होता. यावेळी त्याला एस्कॉर्ट साईटवर त्याच्या पत्नी आणि बहिणीचा फोटो दिसला. पत्नी आणि बहिणीचा फोटो पाहून त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.
त्या व्यक्तीने हे फोटो पत्नी आणि बहिणीला दाखवले. मात्र फोटो 3-4 वर्ष जुने असून कुणीतरी या फोटोंचा गैरवापर केल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने साईटवर दिलेल्या फोनवर कॉल केला.
महिलेला भेटायला बोलावले मग…
हा फोन रेशमा यादव नामक महिलेने उचलला. रेशमाने त्या व्यक्तीला भेटण्यासाठी खारमधील एका हॉटेलमध्ये बोलावले. तो व्यक्ती आपली पत्नी आणि बहिणीसह हॉटेलमध्ये पोहचला. तेथे गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नी आणि बहिणीने रेशमा यादवला आपले फोटो एस्कॉर्ट साईटवर टाकल्याप्रकरणी जाब विचारला.
जाब विचारताच रेशमा यादवने त्या दोघींसोबत भांडण करण्यास सुरुवात केली आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र तिघांनी तिला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान महिला दोषी आढळल्याने पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. पोलिसांनी महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले.