अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला दीड कोटी मिळाल्याचा आरोप, बिग बींच्या बॉडीगार्डची पोलीस आयुक्तांकडून बदली
चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीच्या सेटपर्यंत अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी जितेंद्र शिंदे जातीने हजर असायचा. या काळात बच्चन यांच्याकडून दरवर्षी अंदाजे दीड कोटी रुपये मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे 2015 पासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाची बदली करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदेची (Jitendra Shinde) डीबी मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. शिंदेला अमिताभ बच्चन यांच्याकडून अंदाजे दीड कोटी रुपये वार्षिक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
बदलीचं कारण काय?
जितेंद्र शिंदे कमाईसाठी आणखी कोणता स्रोत वापरत होता, का हेही तपासलं जात आहे. त्यावरुन पोलीस आयुक्तांनी बदली केल्याची चर्चा आहे. मात्र पोलिस आयुक्तांनी पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यातून ही बदली झाल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांचा वैयक्तिक सुरक्षारक्षक
जितेंद्र शिंदेची आता डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे तो 2015 पासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. अनेक कार्यक्रमांमध्ये शिंदे बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून वावरतानाचे फोटोही समोर आले आहेत. चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीचा सेट आणि प्रमोशनसाठी जितेंद्र शिंदे जातीने हजर असायचा. या काळात बच्चन यांच्याकडून दरवर्षी अंदाजे दीड कोटी रुपये मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान जितेंद्र शिंदेच्या पत्नीच्या नावे एक सिक्युरिटी एजन्सी असल्याचाही आरोप आहे. त्यात जितेंद्र पैसे गुंतवत असल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
संबंधित बातम्या :