जिथे कित्येकांना वाचवलं, त्याच वांद्रे वरळी सी लिंकवर मृत्यूने गाठलं! चेतन कदमच्या मृत्यूने हळहळ
दसऱ्याला पहाटे झालेल्या अपघाताने कदम कुटुंबीयांचा आधारच हिरावला! आपलं पुढे कसं होणार, असं प्रश्न आता कदम कुटुंबियांना सतावतोय.
मुंबई : दसऱ्याच्या पहाटे (बुधवार, 5 ऑक्टोबर) मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) इथं अपघात झाला. एक भरधाव क्रेटा कार (Hyundai creta) सी लिंक थांबलेल्या वाहनांच्या रांगेत घुसली. यात 5 जण ठार झाले. चार वाहनं विचित्ररीत्या अपघातग्रस्त झाली. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (Accident CCTV) कैद झाला. ज्या 5 जणांवर या अपघातात काळाने घाला घातला, त्यात चेतन कदम याचाही मृत्यू झाला. चेतन कदम हे वांद्रे वरळी सी लिंकवर काम करणाऱ्या प्रत्येकाला माहीत असलेलं नाव. हेल्परपासून सुपरवायझर पदापर्यंत पोहोचलेल्या चेतनचा प्रवास प्रेरणादायी असाच होता. त्याच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.
चेतन कदम हा 36 वर्षांचा होता. 2009 पासून तो हेल्पर म्हणून वांद्रे वरळी सी लिंकवर कामाला लागला होता. प्रचंड मेहनती. जिंदादिल. आपल्या कामाने त्याने सुपरवायझर पदापर्यंत मजल मारली होती. चेतन सगळ्यांशी मिळून मिसळून राहणाऱ्या चेतनच्या अपघाती मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेलाय. चेतन याने वांद्रे वरळी सी लिंकवर अनेकांना प्राण वाचवले होते.
वांद्रे वरळी सी लिंकवर आत्महत्या करायला अनेकजण यायचे. निराश आणि हताश होऊन आयुष्य संपवण्यासाठी जीव द्यायला आलेल्यांची समजून काढण्यात, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात चेतनचं मोलाची भूमिका अनेकदा बजावली होती. आत्महत्या करण्यायासाठी आलेल्या चार लोकांचा जीव त्याने वाचवलाय. चेतन कदम याने केलेल्या कामाची पावती मुंबई पोलिसांनी दिली होती. मुंबई पोलिसांनी चेतन कदम याला सन्मानित केलं होतं.
कदम कुटुंब पोरकं!
आत्महत्येचा संभाव्य धोका असल्याची घटना लक्षात आली, की समजूत काढण्यासाठी चेतनलाच बोलावलं जात होतं. पण आता त्याच्या मृत्यूने कदम कुटुंबीय पोरके झालेत. घरात कमावणारा चेतन एकटाच! त्याच्या पश्च्यात चार वर्षांचा एक मुलगा, गर्भवती पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे.
दादरच्या फूल मार्केट परिसरात चेतनचा परिवार एका भाड्याच्या घरात राहतो. कोरोना महामारीत चेतनच्या भावाची नोकरी गेली. तेव्हापासून चेतनच्या नोकरीवरच घर चालत होतं. पण आता चेतनच्या मृत्यूने कदम कुटुंबावर मोठं संकट ओढवलंय.
#cctvfootage of Bandra-Worli sea link accident. The accident took place around 3 am between pole numbers 76 and 78 on the south-bound stretch of the sea link bridge, which connects #Bandra in western suburbs to #Worli in south #Mumbai.#Viral #ViralVideos #CCTV #viraltwitter pic.twitter.com/AdPumuxyqC
— Anjali Choudhury (@AnjaliC16408461) October 5, 2022
वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातात चेतन कदम, वय 36, याच्यासह अन्य चार जणांनी जीव गमावला होता. त्यात सोमनाथ बामले, वय 32, राजेंद्र सिंघल, वय 40, गजराज सिंग, वय 42 आणि सतेंद्र सिंह, वय 35 यांचाही समावेश आहे. या अपघातप्रकरणी भरधाव क्रेटा कारच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची कसून चौकशीही केली जातेय.
नजर हटी, दुर्घटना घटी…
क्रेटा कारचा चालक इरफान अब्दुल याची चौकशीही करण्यात आली. त्या चौकशीतून नजरचुकीमुळे हा अपघात घडल्याचं समोर आलंय. इकबाल हे जोगेश्वरीवरुन वरळीच्या दिशेने येत होते. सी लिंकवर असताना त्यांचा मोबाईल फोन बंद पडला होता. तो त्यांना चार्जिंगला लावायचा होता.
मोबाईल चार्जिंगला लावतेवेळी चालक इरफान यांची नजर रस्त्यावरुन हटली. यावेळी गाडीचा वेग प्रचंड होता. नजर हटली आणि भरधाव क्रेटा कार थेट वाहनांच्या रांगेतच घुसली. या भीषण अपघाताआधी याच रस्त्यावर दुसऱया एका वाहनाचा अपघात झाला होता.
एका कारचा टायर फुटल्यामुळे रुग्णवाहिका आणि इतर दोन वाहनं सी लिंकवर थांबलेली होती. टायर फुटलेल्या कारची मदत करतानाच भरधाव क्रेटा या वाहनांच्या लेनमध्ये घुसली आणि भीषण दुर्घटना घडली होती.