विक्रोळीत पिंपळाच्या झाडावर आदळल्यानं भरधाव इनोव्हाचा चेंदामेदा! गाडीत एकूण 8 जण, वाचले किती?
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मध्यरात्री इनोव्हाचा भीषण अपघात! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला निघाले, पण वाटेतच...
मुंबई : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बुधवारी रात्री 12.15 मिनिटांनी एक भीषण अपघात (Eastern Express way Accident) झाला. एक भरधाव इनोव्हा कार (Toyota Innova Car) पिंपळाच्या झाडाला धडकली. हा अपघात इतका जबर होता की दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. वाढदिवसाचं सेलिब्रेशन (Birthday Celebration) करण्यासाठी जात असताना तरुणांच्या कारचा अपघात घडला.
घरच्या सारखे संबंध असलेल्या तरुणांचा ग्रूप या कारमध्ये होता. या अपघाताने वाढदिवासाचं सेलिब्रेशन करायला घरातून उत्साहाने निघालेल्या तरुणांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. विक्रोळीजवळ हा अपघात घडला.
भिवंडी धाबा इथं आठ जण कारमधून बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी निघाले होते. हे सर्व जण कुर्ला पूर्वेला राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे.
जुनैद सलीम कुरेशी , वय 26 हा तरुण कार चालवत होता. या अपघातात इनोव्हा कारमध्ये पुढे बसलेल्या जुनैद कुरेशी आणि साहिल कुरेशी, वय 18 या दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जण जखमी झालेत.
साहिल हा ड्रायव्हिंग कऱणाऱ्या जुनैदच्या बाजूलाच बसला होता. अपघातानंतर सगळ्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे साहिल आणि जुनैद यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर 19 वर्षीय अयान कुरेशी याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीररीत्या जखमी असलेल्या अयान कुरेशीवर आयसीयूत उपचार सुरु आहेत.
या अपघातानंतर इनोव्हा कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. या कारमध्ये असलेल्या अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडची मदत घ्यावी लागील होती.
अक्षरशः दरवाजे कापून या कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. चालकाचं कारवरील नियंत्रणा सुटल्यामुळे हा अपघात घडला, असं पोलिसांनी म्हटलंय.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवण्यासोबत मोटर वाहन कायद्याखाली चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती झोन 7चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांक कदम यांनी दिली.
दरम्यान, या कारमधील सगळ्यांचे रक्ताचे नमुनेही चाचणीसाठी घेण्यात आलेत. दरम्यान, या तरुणांनी मद्यप्राशन केलं होतं का, याची तपासणी करण्यात आली. या रिपोर्टमधून कुणाच्या रक्तात दारुचा अंश आढळून आला नसल्याचं समोर आलंय.