Nawab Malik : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध, याचिकेवर पुढील सुनावणी 26 जुलै रोजी
ईडीचा आरोप आहे की मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला जमिनीसाठी पैसे दिले. पारकरने ते पैसे दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये दाखल केलेल्या अर्जावर ईडी (ED)ने आपले उत्तर दाखल केले आहे. यात ईडीने नवाब मलिक यांच्या जामीन अर्जा (Bail Application)ला विरोध केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी ईडीकडून मलिक यांना अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणेकडून कुठलेही सबळ पुरावे देण्यात आले नसल्याचे सांगत नवाब मलिक यांच्याकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या याचिकेवर 26 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक यांनी केलेला दावा हा योग्य नसल्याचा ईडीने आपल्या उत्तरात म्हटले आहे. मलिक यांच्या विरोधात तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे असल्याचे देखील ईडीने म्हटलेल आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याने नवाब मलिक यांना जामीन दिल्यास त्याचा परिणाम तपासावर होण्याची शक्यता असल्याचे ईडीने आपल्या उत्तरात म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबईच्या कुर्ला येथील जमीन खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रीग आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. ईडीचा आरोप आहे की मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला जमिनीसाठी पैसे दिले. पारकरने ते पैसे दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आतापर्यंत तपास यंत्रणेकडून कुठलेही सबळ पुरावे दिले नसल्याने मलिक यांच्यातर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. आज या प्रकरणात ईडीतर्फे उत्तर दाखल करण्यात आले. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 26 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (ED opposes Nawab Malik’s bail plea, next hearing on July 26)