मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर बेड्या
या प्रकरणात फिर्यादी ही रामदेव त्यागी यांची सून अर्थात आरोपी राज त्यागी यांची पत्नीच आहे. दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर राज यांना काल संध्याकाळी पोलिसांनी अटक केली
मुंबई : दिवंगत आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रामदेव त्यागी यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. राज त्यागींना मुंबईतील वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज त्यागी यांना पाळत ठेवणे (स्टॉकिंग), धमकावणे (क्रिमिनल इंटीमिडेशन) आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. (Former Mumbai Police Commissioner Ramdev Tyagi Son Raj Tyagi arrested)
या प्रकरणात फिर्यादी ही रामदेव त्यागी यांची सून अर्थात आरोपी राज त्यागी यांची पत्नीच आहे. दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर राज यांना काल संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. वांद्रे पोलिसांनी राज यांच्याविरोधात भादंवि कलम 354 (डी), 506 (2) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोण होते रामदेव त्यागी?
रामदेव त्यागी हे महाराष्ट्र केडरचे 1964 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलिस आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. 1995 ते 95 या कालावधीत त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे महासंचालक असताना ते सेवानिवृत्त झाले होते.
वादग्रस्त कारकीर्द
1993 मधील दंगलीच्या कालावधीत त्यागी हे मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त होते. त्यांच्या नेतृत्वात पथकाने सुलेमान बेकरीत केलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी 2001 मध्ये राज्य सरकारच्या विशेष पथकाने 18 पोलिसांवर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र यातील 9 जणांची न्यायालयाने 2003 मध्ये मुक्तता केली होती, त्यामध्ये त्यागी यांचाही समावेश होता.
निवृत्त एसीपीच्या मुलाला बेड्या
दुसरीकडे, मुंबई एनसीबीने महाराष्ट्र पोलिसातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) मुलाला ड्रग्ज प्रकरणात बेड्या ठोकल्या होत्या. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसांपूर्वी गोरेगाव भागात छापा टाकला होता. यावेळी 100 हून अधिक एलएसडी ब्लोट्ससह त्याला अटक करण्यात आली होती. संबंधित एसीपीने नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डमधील अनेक गुन्हेगारांचा सामना केला होता, मात्र त्यांना आपल्याच मुलाबद्दल माहित नसल्याचा दावा केला जात आहे.
संबंधित बातम्या :
90 च्या दशकात अंडरवर्ल्डला भिडलेल्या निवृत्त एसीपीचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अटकेत
(Former Mumbai Police Commissioner Ramdev Tyagi Son Raj Tyagi arrested)