Gold Smuggling : डीआरआयची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, ‘एवढ्या’ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
परदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून कॅप्सूलच्या स्वरूपात शरीरात लपवून, ट्रॅव्हल बॅग, कपड्यांमधून तसेच विविध प्रकारच्या मशिनमधून आणले जात असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडे 20 लाखांहून अधिक रकमेची बेहिशेबी रोकडही सापडली आहे.
मुंबई : मुंबई डीआरआयतर्फे एक मोठी कारवाई करत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत 38 किलो सोने जप्त करण्यात आले असून, जप्त सोन्याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये आहे. तसेच 20 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तस्करीचे हे सोने कोडवर्डच्या माध्यमातून स्थानिक ऑपरेटर्सना दिले जात होते. परदेशातून आणण्यात आलेला सोना लपविण्यासाठी ट्रॅव्हल बॅग, कापड किंवा इतर माध्यमांतून लपवून आणले जात होते.
मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो कॉम्प्लेक्स मुंबईमधून सोन्याच्या तस्करीच्या विविध प्रकरणांच्या तपासादरम्यान, डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी एक विशिष्ट गुप्तचर यंत्रणा विकसित केली होती.
या यंत्रणेने सापळा लावून परदेशातून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. परदेशी नागरिकांचा समावेश असलेले एक सिंडिकेट तस्करी केलेल्या सोन्याच्या प्रक्रियेत आणि वितरणात गुंतले आहे. या सोन्याच्या तस्करीचे पैसे हवाला चॅनलद्वारे वितरित केले जात असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीप्रमाणे सोमवारी डीआरआय मुंबईच्या अधिकार्यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे काम करत सुनियोजित आणि समन्वित ऑपरेशनची योजना आखली आणि अंमलात आणली.
डीआरआय अधिकार्यांच्या पथकाने सीमा शुल्क कायदा, 1962 अंतर्गत संशयित परिसराची झडती घेतली जेथे तस्करीचे प्रकरण समोर आले. सदर परिसराची कसून झडती घेतल्याने प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत 36 किलोपेक्षा जास्त बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 21 कोटी रुपये आढळून आली.
परदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून कॅप्सूलच्या स्वरूपात शरीरात लपवून, ट्रॅव्हल बॅग, कपड्यांमधून तसेच विविध प्रकारच्या मशिनमधून आणले जात असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडे 20 लाखांहून अधिक रकमेची बेहिशेबी रोकडही सापडली आहे.