अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र ईडीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांची तब्येत ठीक नसल्याने आज ते न्यायालयात आले नाहीत.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणात जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आजही सुनावणी झाली नाही. यामुळे देशमुख यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. सीबीआय तर्फे आज कोर्टात सुनावणी दरम्यान या प्रकरणात युक्तिवाद करणारे ईडीचे वकील ए एस जी अनिल सिंह यांची प्रकृती ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे वेळ देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने याचिकेवर पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी ठेवली आहे.
पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी
अनिल देशमुख यांनी सीबीआय प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात 2 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ईडीचे वकील आजारी असल्याने सुनावणी नाही
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र ईडीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांची तब्येत ठीक नसल्याने आज ते न्यायालयात आले नाहीत.
आज ईडीच्या वतीने पुढची तारीख मागण्यात आली. देशमुख यांच्या वतीने याला विरोध करत आरोप करण्यात आला की तपास यंत्रणा वेळ काढूपणा करत आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.