मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई, 50 कोटींचे हेरॉईन जप्त
डीआरआयच्या मुंबई झोनल अधिकाऱ्यांना अदिस अबाबा येथून मुंबईत हवाईमार्गे ड्रग्जची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत तब्बल 50 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अदिस अबाबा येथून आले होते. मुंबई विमानतळावर दाखल होताच डीआरआयने केलेल्या तपासणीत आरोपींकडे 7.9 किलो हेरॉईन हे ड्रग्ज आढळून आले. आरोपींना ड्रग्जसह ताब्यात घेण्यात आले. आरोपींची अधिक चौकशी सुरु आहे.
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयची कारवाई
डीआरआयच्या मुंबई झोनल अधिकाऱ्यांना अदिस अबाबा येथून मुंबईत हवाईमार्गे ड्रग्जची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला.
संशयित नागरिकांची झडती केली असता ड्रग्ज आढळले
विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर डीआरआयचे अधिकारी नजर नजर ठेवून होते. यावेळी दोन इथियोपियन नागरिकांवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आला. अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या सामानाची झडती घेतली.
जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 50 कोटी रुपये
झडतीमध्ये ट्रॉली बॅगमध्ये लपवलेले हेरॉईन आढळून आले. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, 7.9 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 50 कोटी रुपये इतकी आहे.
आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
दोन्ही आरोपींना अटक करत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या ड्रग्जची डिलिव्हरी कुणाकडे करण्यात येणार होती. तसेच या रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास सुरु आहे.
मेफोड्रेन ड्रग्जसह एकाला अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी युनिटने दोन दिवसापूर्वी कारवाई करत एका 46 वर्षीय व्यक्तीला मेफेड्रोन ड्रग्ससह अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी 53.40 लाख रुपये किंमतीचे 267 ग्रॅम मेफेड्रोन एमडी जप्त केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी डोंगरी निवासी असून मुंबई आणि उपनगरात अंमली पदार्थांचा पुरवठा करत होता.