मुंबईत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, बलात्काराचे 550 गुन्हे, किती आरोपींना अटक?
गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते जुलै 2020 या सात महिन्यांदरम्यान मुंबईत बलात्काराच्या 377 घटना घडल्या होत्या. त्यातील 299 घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली. यंदा (2021) बलात्काराच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबई : टाळेबंदी शिथिल होऊ लागताच महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे दाखल झाले आहेत. तर विनयभंगाच्या सुमारे 1100 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून महिलांविरोधातील गुन्ह्यात वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी ते जुलै 2020 या सात महिन्यांदरम्यान मुंबईत बलात्काराच्या 377 घटना घडल्या होत्या. त्यातील 299 घटनांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली. यंदा (2021) बलात्काराच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तितक्याच कालावधीत मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यातील 445 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2020 मध्ये संपूर्ण वर्षात मुंबईत बलात्काराच्या 767 घटना घडल्या होत्या.
विनयभंगाच्या गुन्ह्यांतही वाढ
दुसरीकडे, मुंबईत विनयभंगाचे गुन्हेही वाढले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत विनयभंगाचे 985 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर यंदा 1100 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 2020 मध्ये पूर्ण वर्षात मुंबईत विनयभंगाचे 1945 गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरण
मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात 9 सप्टेंबरच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली होती. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं होतं. मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
साकीनाका खैरानी रोड येथे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
तीन दिवस मृत्यूशी झुंज
या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हेही वाचा :
हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार