देह व्यापाराची हौस महागात, टॅक्सी-निरोधाच्या नावाखाली दीड लाख उकळले, मुंबईकर तरुणाला गंडा
आरोपींनी फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरुन फोन करुन महिला असल्याचं भासवलं, सेक्स सेवा, हॉटेल बुकिंग, स्पेशल कंडोम, स्पेशल टॅक्सी सेवा घेण्यास इच्छुक असल्याचे दाखवून पेटीएमद्वारे तीन हप्त्यांमध्ये त्याच्याकडून 1 लाख 53 हजार रुपये घेतले.
मुंबई : देहव्यापार सेवा पुरवणाऱ्या वेबसाईटसाठी (Online Website) प्लेबॉय म्हणून काम करण्याचं आमिष दाखवत मुंबईतील तरुणाला गंडा घातल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दिल्लीतून एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पीडित तरुणाची 1 लाख 53 हजारांना फसवणूक (Cheating) केल्याचा आरोप आहे. हॉटेल बुकिंग, निरोध, स्पेशल टॅक्सी सेवेच्या नावाखाली आरोपींनी पीडित तरुणाकडून पेटीएमच्या माध्यमातून पैसे उकळल्याचं समोर आलं आहे. महिला असल्याचं भासवून लैंगिक सेवा घेण्याच्या नावाखाली आरोपीने तरुणाला चुना लावला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत दिल्लीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दादर पूर्व येथे राहतो. 12 डिसेंबर रोजी, इंटरनेटवर सर्फिंग करत असताना, त्याला लोकांटो (Lokanto) या लैंगिक सेवा पुरवणाऱ्या वेबसाईटवर प्लेबॉय म्हणून नोकरीची संधी त्याला दिसली. संकेतस्थळावर त्याला एक मोबाईल क्रमांकही सापडला. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी वेबसाईटसाठी काम करणारे कर्मचारी असल्याचं भासवून तरुणाला नोकरीची ऑफर दिली.
तीन हप्त्यांमध्ये दीड लाख उकळले
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरुन फोन करुन महिला असल्याचं भासवलं, सेक्स सेवा, हॉटेल बुकिंग, स्पेशल कंडोम, स्पेशल टॅक्सी सेवा घेण्यास इच्छुक असल्याचे दाखवून पेटीएमद्वारे तीन हप्त्यांमध्ये त्याच्याकडून 1 लाख 53 हजार रुपये घेतले.
तक्रार मिळाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीला राज पार्क पोलिस स्टेशन, नांगलोई, नवी दिल्ली येथून अटक केली. रोहित कुमार असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि दोन डेबिट कार्ड जप्त केले आहेत.
20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
माटुंगा पोलिसांनी रोहित कुमारला कुर्ला न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माटुंगा पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, “आरोपी रोहित कुमारने अशाप्रकारे देशातील विविध राज्यात अनेकांना फसवले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पुढील तपास सुरू आहे.”
संबंधित बातम्या :
नवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण
वैज्ञानिक असल्याचं भासवून 15 महिलांना लग्नाची गळ, विवाहित तरुणाकडून एक कोटींचा गंडा
तीन लाख देऊन ‘लग्नाळू’ तरुण बोहल्यावर, दहाच दिवसात वधू म्हणाली, “सोडा.. मला आधीच दोन…”