CCTV | विरारमध्ये चक्क पाण्याच्या प्लॅस्टिक ड्रमची चोरी, अल्पवयीन मुलं सीसीटीव्हीत कैद
पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या ड्रमची चोरी झाल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. विरार पूर्व सहकार नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत
विरार : कोण कशाची चोरी करेल, याचा काही नेम राहिला नाही. कारण चक्क पाण्याच्या प्लॅस्टिक ड्रमची (Plastic Drum) चोरी झाल्याचे उघड झाले आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील विरार शहरात (Virar Crime News) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरी करताना दोन अल्पवयीन मुलं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैदही झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी दोन्ही मुलांना पकडून चोप दिला आणि समज देऊन सोडून दिले, अशी माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या ड्रमची चोरी झाल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. विरार पूर्व सहकार नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अल्पवयीन मुलांना चोप देऊन समज
चोरीची घटना सोसायटी मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे स्थानिक नागरिकांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांना चोप देऊन समज दिली आणि दोघांनाही सोडून दिले आहे.
पाणीटंचाईने नागरिक त्रस्त
विरार पूर्व फुलपाडा, सहकार नगर परिसरात पाणी टंचाईने नागरिक त्रस्त आहेत. 3 ते 4 दिवसा आड होणारा पाणी पुरवठा, त्यात कधीकधी कमी दाबाने सुटणारे पाणी, यामुळे पाणी साठवणूक करण्यासाठी ही ड्रमची चोरी केली असल्याचे समोर आले आहे.