Parambir Singh | परमबीर सिंह यांच्यावरील गुन्ह्याच्या तपासासाठी SIT ची नेमणूक
भाईंदर येथील विकासक (बिल्डर) श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक करण्यात आली आहे. परमबीर सिंह आणि इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
भाईंदर येथील विकासक (बिल्डर) श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन येथे मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपाससुद्धा याच एसआयटीकडून केला जाणार आहे.
शरद अग्रवाल यांचाही आरोप
दुसरीकडे, परमबीर सिंह यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. शरद अग्रवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपाखाली ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.
परमबीर सिंग आणि अनिल देशमुख प्रकरण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
संबंधित बातम्या
परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ, ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
ईडीची पहिली मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4 कोटींची संपत्ती जप्त
परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता वरिष्ठ पोलिसांवर खंडणीचा गुन्हा, कुणाकुणाची नावं?