CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण
रात्रीच्या सुमारास निशांत यांचा भाऊ घरी जात असताना राज देशेकर हा गाडीला आडवा आला आणि त्यावरून शिवीगाळ करत हुज्जत घातल्याचा आरोप निशांत यांच्या भावाने केला.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने एका तरुणाला रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जुन्या अंबरनाथ गाव परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. रात्री गाडी अडवल्याने पदाधिकाऱ्याने सकाळी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
अंबरनाथच्या पालेगाव-जुन्या अंबरनाथ गाव परिसरात राज देशेकर हा वास्तव्याला आहे. राज हा याच परिसरातील मनसे शहर उपाध्यक्ष अजय पाटील यांच्याकडे इंटरनेट विभागात काम करतो. शुक्रवारी दुपारच्या सुमारास राज हा त्याच्या ऑफिसबाहेर उभा असताना शिवसेनेचे उपविभागप्रमुख निशांत पाटील यांच्यासह राजू पाटील आणि स्वप्नील निळजेकर हे तिघे गाडीतून तिथे आले आणि त्यांनी रॉडने राज देशेकर याला मारहाण केली.
घटना सीसीटीव्हीत कैद
मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर राज याने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याआधारे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान या सगळ्याबाबत निशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर निशांत यांच्या भावाला विचारलं असता, काल रात्रीच्या सुमारास निशांत यांचा भाऊ घरी जात असताना राज देशेकर हा गाडीला आडवा आला आणि त्यावरून शिवीगाळ करत हुज्जत घातल्याचा आरोप निशांत यांच्या भावाने केला. त्यावरूनच सकाळी निशांत पाटील यांनी राज देशेकर याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्यात आता पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावं लागेल.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
लग्नाआधीच आक्रित! नदीत सेल्फी घेताना मुंबईकर महिला बुडाल्या; सासूचा मृत्यू, होणाऱ्या सूनबाई बेपत्ता
दोन वर्षांनी गूढ उकललं, बाईक प्रवासात मालकाची कर्मचाऱ्याकडूनच हत्या, मृतदेह दरीत टाकला
परजातीच्या प्रियकरामुळे अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट, आईला संताप अनावर, मुलाच्या मदतीने लेकीचा जीव घेतला