CCTV | नव्या-कोऱ्या मोबाईलला हातही लावला नाही, बदलापुरात दुरुस्तीसाठी आलेल्या फोनवर चोरट्यांचा डल्ला
शिरगाव आपटेवाडी नाक्यावर तुषार पवार यांच्या मालकीचं आर. टी. इन्फोटेक नावाचं मोबाईलचं दुकान आहे. या दुकानात बुधवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे शटर वाकवून आत घुसले.
बदलापूर : चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरातील पूर्व भागात शिरगाव आपटेवाडी परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे शोकेसमधल्या नवीन मोबाईलला चोरट्यांनी हातही लावला नाही. तर दुकानात रिपेरिंगसाठी आलेले आणि रिचार्ज करण्यासाठी ठेवलेले फोन या चोरट्यांनी चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काय आहे प्रकरण?
शिरगाव आपटेवाडी नाक्यावर तुषार पवार यांच्या मालकीचं आर. टी. इन्फोटेक नावाचं मोबाईलचं दुकान आहे. या दुकानात बुधवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे शटर वाकवून आत घुसले. यानंतर त्यांनी बॅटरीच्या साहाय्याने मोबाईलच्या दुकानात शोधाशोध केली.
दीड लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार
दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेला एक लॅपटॉप, काही मोबाईल फोन्स, स्मार्टवॉच, हेडफोन्स असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे शोकेसमधल्या नवीन मोबाईलला मात्र या चोरट्यांनी हात लावला नाही. तर दुकानात रिपेरिंगसाठी आलेले आणि रिचार्ज करण्यासाठी ठेवलेले फोन या चोरट्यांनी चोरून नेले.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध
चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेमुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी दुकानं फोडणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. या चोरी प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
पाहा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज
संबंधित बातम्या :
अवघ्या 400 रुपयांवरुन वाद, तरुणाला भोसकलं, अल्पवयीन तरुणासह पाच जण गजाआड
लग्नाची तारीख ठरली, मॉडेलवर बलात्कार, पीडिता गरोदर होताच नवरदेव पळाला