शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची मर्सिडीज उलटली, मुलगा जखमी, कल्याण-शीळ रस्त्यावर विचित्र अपघात
मधोमध उभ्या असलेल्या व्हॅगन आर आणि टेम्पोला पाहून चालकाने गाडी बाजूने काढण्याचा विचार केला. मात्र गाडी वेगात होती. हीच गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढून पलटी झाली. या अपघातात एकाला किरकोळ मार लागला आहे
कल्याण : गेल्या दोन वर्षांपासून कल्याण-शीळ रस्त्याचे (Kalyan Shil Road) काम सुरु आहे. एकीकडे संथ गतीने सुरु असलेले काम आणि दुसरीकडे अर्धवट कामांमुळे दररोज अपघात होत आहेत. कल्याण-शीळ रस्त्यावर सोमवारी रात्री झालेल्या एका विचित्र अपघातात तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातात शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या कारचाही समावेश असून यात त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालक आणि प्रवासी हैराण आहेत. या रस्त्याच्या अर्धवट कामासाठी कोण जबाबदार आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण-शीळ रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका महागड्या कारला भीषण अपघात होऊन चालक गंभीररित्या जखमी झाला होता. सोमवारी रात्री याच ठिकाणी पुन्हा एक विचित्र अपघात झाला आहे. शीळ फाट्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या तीनचाकी टेम्पोने दुभाजकाला धडक दिल्याने पलटी झाला. त्याच्या मागून येणाऱ्या व्हॅगन आर कारने टेम्पोला धडक दिली.
मर्सिडीज कार मातीच्या ढिगाऱ्यावरुन उलटली
दोन्ही वाहन चालक पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता शीळ फाट्याहून एक मर्सिडीज कार आली. त्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा मुलगा हरमेश शेट्टी आणि त्यांचा चालक होता. मधोमध उभ्या असलेल्या व्हॅगन आर आणि टेम्पोला पाहून गाडी बाजूने काढण्याचा विचार केला. मात्र गाडी वेगात होती. हीच गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढून पलटी झाली. या अपघातात एकाला किरकोळ मार लागला आहे, अशी माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रदीप गायकवाड यांनी दिली आहे.
कल्याण शीळ रस्त्यावर अपघातांची मालिका
कल्याण शीळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे सहापदरी काम सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरुच आहे. काम संथ गतीने सुरु असल्याने वारंवार लोकप्रतिनिधींना सवाल विचारले जात आहेत. संतप्त झालेल्या मनसे आमदारांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते की, रस्त्याच्या कामामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात लोक आम्हाला घरी येऊ देणार नाहीत. वारंवार तक्रार करुन सुद्धा अनेक ठिकाणी अर्धवट कामं राहिल्यामुळे अपघात होत आहेत. कल्याण पूर्व भागातील याच रस्त्यावर टाटानाका नजीक पांडुरंगवाडी येथे रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मातीचा ढिगारा ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी नेहमी अपघात होतात.
संबंधित बातम्या :
संसार उमलण्याआधीच गालबोट, सासरी जाताना गळ्यात मांजा अडकला, नवविवाहित तरुणाचा मृत्यू
मद्यधुंद कार चालकाचा हैदोस, सात गाड्यांना उडवून झाडावर धडकला, पादचाऱ्यांनी चोपला
कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, उल्हासनगरच्या प्राध्यापिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा