आयपीएल सामन्यांवर बेटिंग, उल्हासनगरात तीन बुकींना अटक, 25 लाखांची रोकड जप्त
उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागातील थायरासिंग दरबार परिसरात माँ बजाज व्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात काही बुकी आयपीएल सामन्यांवर बेटिंग करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती
उल्हासनगर : उल्हासनगरात आयपीएल सामन्यांवर सुरु असलेल्या बेटिंगचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. तसंच तीन बुकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांकडून 25 लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागातील थायरासिंग दरबार परिसरात माँ बजाज व्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात काही बुकी आयपीएल सामन्यांवर बेटिंग करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेनं शनिवारी आयपीएल मॅच सुरू असताना या बंगल्यावर धाड टाकली.
बेटिंग सुरू असतानाच रंगेहाथ बेड्या
या ठिकाणी गुगल पे द्वारे बेट स्वीकारून ऑनलाईन सॉफ्टवेअरवर त्याची नोंद केली जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं बेटिंग सुरू असतानाच पोलिसांनी रंगेहाथ तीन बुकींना अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा अशी या तीन बुकींची नावं आहेत.
या तिघांकडून 25 लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली. सकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यात सट्टेबाजांना अटक
याआधी, पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमजवळ झालेल्या क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले होते. वेस्ट इंडिज येथील एका इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील कर्मचाऱ्याचे नाव समोर आले होते. भारत विरुद्ध इंग्लड सामन्यातील प्रत्येक बॉलवर डोंगरावरुन दुर्बिणीच्या माध्यमातून नजर ठेवली गेली होती. सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना पुण्यात मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती.
गडचिरोलीत ऑनलाईन बेटिंग
दुसरीकडे, गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात सक्रिय असलेल्या बीटेक्स 1 को आणि नाईस 777 नेट या ऑनलाईन बेटिंग प्लॅटफार्मवर जुगार खेळणाऱ्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले. ऑलिम्पिक स्पर्धेसह आयपीएल, फुटबॉल आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात बेटींग करण्यात या टोळीचा समावेश असून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असल्याचा अंदाज आहे. पोलीसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
संबंधित बातम्या :