Mumbai Crime : ट्रकने स्कूटरला धडक दिली, मग ट्रकचालकाला अद्दल घडवण्यासाठी दुचाकी चालकाने जे केले त्याने पोलीसही चक्रावले !
ट्रकने स्कूटरला धडक दिली. याचा राग मनात ठेवून एका व्यक्तीने जे केले त्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
मुंबई / 26 जुलै 2023 : ट्रकची स्कूटरला धडक बसली म्हणून संतापलेल्या दुचाकी चालकाने जे केले ते पाहून पोलीसही हैराण झाले. ट्रक चालकाचा बदला घेण्यासाठी स्कूटर चालकाने सदर ट्रकमध्ये दहशतवादी कारवायांसाठी लागणारे सामान असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीने मध्यरात्री 1 वाजता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन ही माहिती दिली. यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहत पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली. मात्र फोनवरुन मिळालेल्या माहितीवरुन तपास केला असता हा फेक कॉल असल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. निलेश देवपांडे असे अटक आरोपीचे नाव आहे.
बदल्याच्या भावनेने आरोपीने केले कृत्य
मुंबईतील कांजुरमार्ग येथील रहिवासी असलेला निलेश देवपांडे हा स्कूटरवरुन जात असताना एका ट्रकने त्याच्या स्कूटरला टक्कर दिली. या धडकेत नीलेशला किंवा स्कूटीला कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही. मात्र टक्कर दिल्याने निलेश चिडला होता. यामुळे त्याने ट्रक चालकाचा बदला घेण्याचे ठरवले.
तपासात फोन फेक असल्याचे निष्पन्न
बदला घेण्यासाठी त्याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला. त्याने फोनवरुन पोलिसांना दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला ट्रक घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस तात्काळ सक्रिय झाले. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि गोवा पोलीस नियंत्रण कक्षालाही याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तात्काळ सदर ट्रकचा शोध सुरु झाला. मात्र तपास पूर्ण करत ट्रकचा शोध घेतला असता भलतंच प्रकरण समोर आलं.
आरोपीला अटक
नियंत्रण कक्षाला आलेला फोन फेक असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने देवपांडेला तात्काळ अटक केली. आरोपीची चौकशी केली असता बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत दिशाभूल करण्याचा आणि व्यत्यय आणण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याबद्दल आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.