VIDEO | अचानक धपकन पाठीवर हात आला आणि… सविता मालपेकरांनी सांगितला शिवाजी पार्कातील सोनसाखळी चोरीचा भयानक अनुभव
मोबाईलवर बोलत असताना एका बाजूने एक माणूस आला आणि त्याने मला वेळ विचारली. मी म्हटलं माहिती नाही, माझ्याकडे घड्याळ नाही. तर तो म्हणाला तुमच्या मोबाईलमध्ये बघा ना... सविता मालपेकर यांच्या तोंडून ऐका तो अनुभव
मुंबई : दिग्गज अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांची सोनसाखळी खेचून चोराने पळ काढल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मुंबईतील दादरमध्ये शिवाजी पार्कसारख्या गजबजलेल्या भागात मालपेकरांच्या गळ्यातील चेन खेचून चोरट्याने पळ काढला. त्यानंतर सविता मालपेकर यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
सोमवार 19 जुलैच्या रात्री सविता मालपेकर यांची सोनसाखळी चोरीला गेली. “मी नेहमीच संध्याकाळी शिवाजी पार्कला वॉक करण्यासाठी येते. त्या दिवशीही संध्याकाळी साडेसात वाजता आले. पार्काला तीन राऊण्ड मारुन मी कट्ट्यावर बसले. मोबाईलवर बोलत असताना एका बाजूने एक माणूस आला आणि त्याने मला वेळ विचारली. मी म्हटलं माहिती नाही, माझ्याकडे घड्याळ नाही. तर तो म्हणाला तुमच्या मोबाईलमध्ये बघा ना. मी म्हटलं मी फोनवर बोलत आहे, मी नाही बघणार. त्यावर तो निघून गेला आणि मी बोलायला लागले. त्यानंतर दहा मिनिटांनी तो मागून आला.” असं सविता मालपेकर सांगत होत्या.
“अचानक, धपकन माझ्या पाठीवर हात आला. मला आधी वाटलं एखादा मोठा कुत्रा माझ्यावर हल्ला करतोय की काय. मी बघायला मागे वळले, तोच तो कट्ट्यावरुन उडी मारुन समोरच्या बाजूला आला. त्याने जवळच बाईक लावली होती. तो सोनसाखळी खेचून बाईकवरुन पसार झाला. शिवाजी पार्कला नेहमी गर्दी असते, पण पावसामुळे त्या दिवशी फार वर्दळ नव्हती. जी काही मुलं होती, ती धावत त्याच्या मागे गेली, पण तो सापडला नाही. पण शिवाजी पार्क पोलिसांचे आभार, त्यांची गाडी एका मिनिटात तिथे आली” असं मालपेकरांनी सांगितलं.
जोरदार हिसक्याने ड्रेस फाटला
“त्याने इतक्या जोरात खेचलं होतं, की माझा ड्रेस फाटला. एका मुलाने मला जॅकेट दिलं. त्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसून मी पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासलं. मला त्याचा फोटो दाखवला, मी त्याच्याशी बोलले असल्यामुळे त्याला लगेच ओळखलं. त्याने डोक्याला पांढरा रुमाल लावला होता, आणि मास्क घातला होता. आपली पोलीस यंत्रणा अत्यंत तत्पर आहे. ते आरोपीला लगेचच बेड्या ठोकतील” असा विश्वास सविता मालपेकर यांनी व्यक्त केला. सगळ्या गेटसह मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, त्यामुळे सोनसाखळी चोरतानाची घटनाही त्यात कैद झाली असती, अशी मागणी त्यांनी केली.
मी चाळीस वर्ष शिवाजी पार्क परिसरात राहत आहे, मात्र माझ्यासोबत इथे असा प्रकार कधीच घडला नाही. याआधी शूटिंगवरुन परत येताना वांद्र्यात माझं मंगळसूत्र आणि चेन चोरीला गेली होती, अशी आठवण सविता मालपेकर यांनी सांगितली.
पाहा व्हिडीओ
कोण आहेत सविता मालपेकर?
अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.
‘हाहाकार’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘गड्या आपला गाव बरा’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘नटसम्राट’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘शिकारी’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘7 रोशन व्हिला’ अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत. सविता मालपेकर यांनी गेल्याच वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
‘मुलगी झाली हो’ मालिकेत सध्या सविता मालपेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. याच मालिकेतील अभिनेता योगेश सोहोनी याचीही काही दिवसांपूर्वी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लूट झाली होती. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला पकडलं होतं.
संबंधित बातम्या :
हिप्नोटाईज करुन 50 हजार लंपास, अभिनेता योगेश सोहोनीला लुटणारा दोन दिवसात गजाआड
वेळ विचारण्याचा बहाणा, पार्कात बाकड्यावर बसलेल्या सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार!
प्रिया बेर्डेंपाठोपाठ आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री राष्ट्रवादीत
(Marathi Actress Savita Malpekar shares tragic experience of Chain Snatching at Mumbai Dadar Shivaji Park)