व्यायाम शिकवण्याच्या बहाण्याने जीम ट्रेनरचं नको ते कृत्य! तरुणी बिथरलीच आणि…
महिलांनो, तुम्हीही जीममध्ये जात असाल, तर ही बातमी वाचाच! मुंबईतील खळबळजनक घटना
मुंबई : महिलांनो, तुम्ही व्यायाम (Women Exercise) करण्याच्या उद्देशाने जर व्यायामशाळेत (Gym) जात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चारकोपमध्ये एका जीम ट्रेनरला (Gym Trainer arrested) अटक करण्यात आली आहे. या जीम ट्रेनवर व्यायाम करण्यासाठी आलेल्या तरुणीने सनसनाटी आरोप केलाय. व्यायाम करण्याच्या बहाण्याने जीम ट्रेनरने तरुणीला नको तिथे आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आलीय.
नेमकं काय घडलं?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका 25 वर्षीय तरुणीने चारकोप पोलीस स्थानकात तक्रार दिली. ही तरुणी कांदिवलीतल्या एका हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेली होती. शुक्रवारी ती व्यायाम करण्यासाठी गेली असता तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला.
जीम ट्रेनरने या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप केला जातोय. व्यायाम शिकवतेवेळी तरुणीला जीम ट्रेनरने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. यानंतर तरुणीने चाकरोप पोलीस ठाण्यात जात रितसर तक्रार दाखल केली.
जीम ट्रेनरला अटक
चारकोप पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयित आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी हा गेल्या चार वर्षांपासून जीम ट्रेनर म्हणून काम करतोय. आरोपीचं वय 35 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या आरोपीची पोलिसांकडून चौकशी केली जातेय. वेगवेगळ्या कलमांखाली आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिटनेससाठी अनेक महिला, तरुणी या जीममध्ये जाऊन व्यायाम करणं पसंद करतात. काही जीममध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी महिला किंवा तरुणींची नेमणूक केलेली असते. पण काही जीममध्ये मात्र असं दिसून येत नाही. अशावेळी पुरुष जीम ट्रेनरवरच काही महिलांना अनेकदा अवलंबून राहावं लागतं.
या घटनेमुळे जीममध्ये व्यायामासाठी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दरम्यान, ज्या जीम ट्रेनरने चारकोपमध्ये हे कृत्य केलं, तो जीम ट्रेन पीडित तरुणीचा पर्सनल जीम ट्रेनर होता का? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र या घटनेनं जीम मध्ये जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झालाय.