Passengers Train Firing Update : जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेन गोळीबार प्रकरण, आरोपी चेतन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ
जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.
मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई पॅसेंजर गोळीबार प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. या अस्वस्थेतून त्याने हा गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आरोपी चेतनची गुजरातहून मुंबईला बदली झाल्याने तो नाराज होता. यामुळे अस्वस्थ असल्याने त्याने हे कृत्य केले. बोरीवली पोलिसांकडून आरोपीची अद्याप चौकशी सुरु आहे. चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. आरोपीवर सध्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुपारी 3 वाजता आरोपीला बोरीवली कोर्टात हजर केले जाणार आहे. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या टीसी आणि इतर कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
फॉरेन्सिक टीम मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल
आरोपीने गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जीरपीच्या दोन जवानांनी त्याला पकडले. बी-5 बोगीच्या शेजारी असलेल्या पँट्रीच्या दरवाजावरही गोळी लागली आहे. गोळीबारानंतर आरोपीने ट्रेन फिरत प्रवाशांध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई सेंट्रल स्थानकात फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ट्रेन कारशेडला रवाना करण्यात आली आहे. तेथे फॉरेन्सिक टीम ट्रेनची तपासणी करण्यात येणार आहे.
सूरतहून दोघेही ट्रेनमध्ये चढले
जयपूरहून मुंबईला ट्रेन येत होती. यावेळी गुजरातमधील सूरतमध्ये आरोपी चेतन आणि एएसआय टीकाराम यांची ड्युटी सुरु झाली. यानंतर पालघर ते विवार दरम्यान ट्रेन आली असताना चेतन आणि टीकाराम यांच्यात वाद झाला. याच वादातून चेतन याने टीकाराम यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर एएसआय टीकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर प्रवाशांनी आरोपीला जाब विचारण्यास सुरुवात केली. यामुळे आरोपीने तीन प्रवाशांवरही गोळीबार केला.