Mumbai Crime : गोल्ड लोन ट्रान्सफरच्या नावाखाली बँकेची लाखोंची फसवणूक, काय आहे प्रकरण?
हल्ली फसवणुकीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. हल्ली बँकांची फसवणूक करण्.याच्या घटनाही वाढल्या आहेत. अशीच एक दादर परिसरात उघडकीस आली आहे.
मुंबई / 15 ऑगस्ट 2023 : गोल्ड ट्रान्सफरच्या नावाखाली एका व्यक्तीने बँकेला लाखों रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईतील दादर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याचे कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याच्या बहाण्याने आरोपीने बँकेची 22.65 लाखांची फसवणूक केली. शैलेश सुरेश गवळी असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रुपी कॅपिटल प्रा. लि. चे व्यवस्थापक किशोर शक्तीवेल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
रुपी कॅपिटल कंपनीचे व्यवस्थापक किशोर शक्तीवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश गवळी याने त्यांच्या कंपनीला फोन करुन तो व्यावसायिक असल्याचा दावा केला होता. तसेच आपल्याला व्यवसायासाठी तातडीने निधीची गरज असल्याचे सांगितले. तसेच आपले ग्रेटर बॉम्बे को ऑप सोसायटी लिमिटेड बँकेत सोने कर्ज सुरु असून, तेथे बँकेचे व्याजदर अधिक असल्याने आपणाला ते हस्तांतरित करायचे आहे, असे त्याने सांगितले.
आरोपीने 560 ग्राम सोने ग्रेटर बॉम्बे को ऑप सोसायटी लिमिटेड बँकेत तारण ठेवल्याचे सांगितले. सदर गोल्ड लोनचे कागदपत्रही बँकेला दाखवले. त्यानुसार किशोर यांनी आरोपीला सदर कर्जाची रक्कम मंजूर करुन आरोपीकडे दिली. करारानुसार, गवळीने दुसऱ्या दिवशी 560 ग्रॅम सोने कंपनीला देणे आवश्यक होते. मात्र आरोपीने तसे केले नाही. बँकेने सोन्याची मागणी केली असता आरोपीने ते सोने सोनाराला विकल्याचे सांगितले.
गवळी याने कंपनीला आश्वासन दिले की, तो निधी मिळाल्यावर पैसे परत करेल आणि नंतर कंपनीला एकूण 9 लाख रुपयांचे दोन धनादेश दिले. तथापि, गवळीने 560 ग्रॅम सोने गहाण ठेवण्याच्या कराराचा भंग केला होता. यामुळे कराराच्या अटींचे पालन न केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला गेला.