Mumbai Crime : वरळी सी-लिंकवरून अज्ञात व्यक्तीने घेतली उडी, नौसेनेकडून सुमद्रात शोध सुरु
वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन उडी घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा अशीच घटना उघडकीस आली आहे.
कृष्णा सोनारवाडकर/गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. पुन्हा एकदा सी-लिंकवरुन उडी घेतल्याची घटना आज पहाटेच्या 5.30 च्या सुमारास उघडकीस आली आहे. दीपक खूपचंदानी असे उडी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर नौदलाकडून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून समुद्रात उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. दिपक खूपचंदानी हा खारमधील रहिवासी असून, वांद्र्याकडून वरळीकडे सी-लिंकवरुन जात होता. मात्र दिपक याने हे कृत्य का केले याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. वरळी पोलीस पुढील तपास करत आहेत.
गाडी सी-लिंकवर पार्क केली अन् उडी घेतली
दिपक खूपचंदानी हा व्यक्ती खार पश्चिमेतील रहिवासी आहे. पहाटे 5.30 वाजता खूपचंदानी वांद्रे-वरळी सी-लिंक येथे गेले. गाडी सी-लिंकवर पार्क केली. यानंतर त्यांनी समुद्रात उडी घेतली. घटना उघड होताच वरळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खूपचंदानी यांचा शोध घेण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टरही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी दिपकच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, खूपचंदानी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. पोलीस खूपचंदानी कुटुंबाची चौकशी करत आहेत. नौदलाकडून सकाळपासून खूपचंदानी यांचा शोध सुरु आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही. सी-लिंकवरुन उडी घेण्याच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत.