कागदपत्रांमध्ये फेरफार करून ग्राहकाचा फ्लॅट ठेवला गहाण; बँक व्यवस्थापक, एक्सपोर्ट हाऊसच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
बँकेत कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ग्राहकाची मोठी फसवणूक बँक व्यवस्थापकाने केल्याचे उघडकीस आले आहे. घटना उघड होताच एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई / 12 ऑगस्ट 2023 : नागरिकांना वैयक्तिक तसेच व्यावसायिक कारणांसाठी कर्जाची गरज भासते गरजू लोकांची हीच निकड लक्षात घेऊन अनेक महाभाग फसवणुकीचे प्रकार करीत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अशा फसवणुकीला सध्या पेव फुटले आहे. पश्चिम उपनगरातील मालाड येथे अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यवसाय उभारणीचे कारण दाखवत कर्ज मिळवण्यासाठी मालाड येथील बहुमजली इमारतीतील व्यावसायिकाचा फ्लॅट फसवणूक करून गहाण ठेवण्यात आला. कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून हा कर्ज घोटाळा करण्यात आल्याचेही उजेडात आले आहे. याप्रकरणी खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेचा व्यवस्थापक आणि एक्सपोर्ट हाऊसच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्ज घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये आणखी काही आरोपी सहभागी असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास सुरु आहे.
दिंडोशी सत्र न्यायालयात दावा दाखल
या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी फायनान्शियल मार्केटिंग व्यावसायिक गणेश प्रसाद भाटच्या तक्रारीवरून कांदिवली लोखंडवाला टाऊनशिप येथील खाजगी बँकेचा व्यवस्थापक तसेच केसरी एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक भाटच्या वतीने अॅड. मोहित भारद्वाज यांनी हा दिवाणी दावा दाखल केला आहे.
व्यावसायिक भाटला कोरोना महामारी काळात व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आधीच्या कर्जाचा मोठा भार वाढला. त्या कर्जाची परतफेड तसेच व्यवसायामध्ये स्वतःला सावरण्यासाठी भाटने मालमत्तेवर अतिरिक्त कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच्या याच गरजेचा गैरफायदा घेऊन बँक व्यवस्थापक आणि एक्सपोर्ट हाऊसच्या संचालक मंडळींनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून भाटचा फ्लॅट गहाण ठेवल्याचे उघडकीस आले आहे.


