मुंबई : मुंबई पोलीस त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. मुंबईवर कोणतंही संकट आलं तरी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांचं संरक्षण केलंय. मुंबई पोलीस 24 तास शहराच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना देखील मुंबई पोलिसांचा खूप अभिमान वाटतो. विशेष म्हणजे मुंबईकरांच्या मनात मुंबई पोलिसांबद्दल आणखी आदर वाढवणारी कामगिरी त्यांनी करुन दाखवली आहे. कांदिवली पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीचं अपहरण करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.
विशेष म्हणजे वेश पालटून मुंबई पोलिसांनी आरोपींच्या नांग्या ठेचल्या आहेत. हे आरोपी म्हशींच्या गोठ्यात म्हशींच्या पाठीमागे लपले होते. पण हिंदीत एक म्हण आहे, ‘कानून के हात लंबे होते है’, अगदी त्याचाच प्रत्यय या आरोपींनादेखील आला आहे. कर्जत येथील एका तबेल्यात लपून बसलेल्या तीन अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी कांदिवली पोलिसांनी म्हशींच्या गोठ्यातील दूध विक्रेताचा वेश बदलून म्हशींच्या मागे लपलेल्या तीन अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.
मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी या कारवाईविषयी माहिती दिली. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरणाचे गूढ उकलण्यासाठी कांदिवली पोलिसांनी तपास अधिकारी एपीआय हेमंत गीते यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. तपासादरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे 3 अपहरणकर्ते लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कांदिवली पोलिसांचे पथक दूधवाला भैय्याच्या वेशात कर्जतमधील त्या तळ्यामध्ये गेले आणि म्हशींच्या मागे लपलेल्या 3 आरोपींना अटक केली.
या आरोपींनी पीडित व्यक्तीला अपहरण केल्यानंतर प्रथम आरे कॉलनीतील जंगलात नेले. आरोपींनी पीडित व्यक्तीच्या पत्नीच्या बँक खात्यातील 2 लाख 75 हजार रुपये त्यांच्या मोबाईलवरून स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. एवढेच नाही तर आरोपींनी पीडित व्यक्तीच्या एटीएम कार्डमधून 1 लाख रोख पैसेही काढले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने पीडित व्यक्तीला धमकावून आरेच्या जंगलात सोडले.
1. अच्छेलाल चित्रू यादव, वय 52 वर्षे
२. मनोहर हरिश्चंद्र देवघरे, वय ३६ वर्षे
3. मनीष अशोक पंचरस, वय 40 वर्षे
हे तिन्ही आरोपी कर्जत जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवासी आहेत. पीडित व्यक्ती आणि आरोपींमध्ये पैशाच्या व्यवहाराचे प्रकरण होते. पैसे वसूल करण्यासाठी या आरोपींनी पीडितेचे अपहरण केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कांदिवली पोलिसांनी सध्या तिन्ही आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.