मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक झाली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबी अधिकारी आर्यनला आता मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले आहेत. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना अटक केली आहे. त्याबाबतची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी चौघांची चौकशी झाली असून त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतर चार जणांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे.
आर्यनने ड्रग्ज सेवन करण्यासाठी सोबत नेल्याची कबुली एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे ड्रग्ज सेवन आणि बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आले आहे. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर आर्यनसह चारही आरोपींना जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल. आर्यनच्या मेडिकल चाचणीसाठी एनसीबी अधिकाऱ्यांची एक व्हॅन निघाली आहे. त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांची देखील एक व्हॅन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आली आहे.
वैद्यकीय चाचणीनंतर आरोपींना जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल. तिथे त्यांच्या कस्टडीची मागणी केली जाईल. एनसीबी अधिकाऱ्यांकडून किती दिवसांची मागणी केली जाते हे महत्त्वाचं आहे. कोर्टात आता नक्की काय घडेल ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण गेल्या दोन वर्षातील ही मोठी हाय प्रोफाईल केस आहे.
आर्यनसोबत अटकेत असलेल्या त्याचा सहकारी अरबाज मर्चंट याच्या बुटातही ड्रग्ज आढळल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. अटक केलेले सर्व आरोपी पहिल्यांदाच ड्रग्ज सेवन करत होते का की त्यांची आधीसुद्धा ड्रग्ज सेवन करण्याची हिस्ट्री आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी एनसीबीकडून मॅरेथॉन चौकशी सुरु आहे. सर्व आरोपींच्या चौकशीतून काही दुसऱ्या ठिकाणच्या लिंक मिळतात का याचा तपास सुरु आहे.
आर्यन याच्याकडून कोणत्या प्रकाराचं ड्रग्ज लेन्सच्या डब्ब्यातून नेलं होतं याची माहिती एनसीबी अधिकारी कोर्टात देतील. त्यानंतर त्याच्या कस्टडीची कायदेशीर मागणी केली जाईल. आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण कॉमेडियन भारतील हिला देखील ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिला न्यायलयीन कोठडी मिळाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिला जामीन मिळाला होता. तशाच प्रकारचा घटनाक्रम या प्रकरणात बघायला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
क्रूझ मुंबईवरून गोव्याला जात होते. शनिवारी दुपारी क्रूझ निघाले होते. 4 ऑक्टोबर रोजी ते मुंबईत येणार होते. तीन दिवस ही पार्टी चालणार होती. या पार्टीसाठी दिल्लीहून तीन मुली आल्या होत्या. या तिघींची कसून चौकशी सुरू आहे. या तिघीही उद्योगपतींच्या मुली आहेत. एनसीबीने या मुलींचेही फोन जप्त केले आहेत. फोनमधील चॅटची कसून तपासणी केली जात आहे. तसेच एनसीबीच्या दिल्ली हेडक्वॉर्टरमधून या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणात न्यायसंगत आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली जाईल. ड्रग्जप्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्यांच्याविरोधात कारवाई होणारच, असं एनसीबीने स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आर्यन खान
अरबाज मर्चंट
मुनमुन धनीचा
नुपुर सारिका
इश्मीत सिंह
विक्रांत चोकर
गोमित चोपड़ा
मोहक जसवाल
या प्रकरणी एनसीबीने सहा आयोजकांना समन्स जारी केलं आहे. तसेच फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी काशिफ खान यांनाही पाचारण केलं आहे. तसेच कॉर्डेलिया क्रूझचे अध्यक्ष आणि सीईओ जुर्गन बेलोम यांनी सांगितले की, छापेमारीवेळी एनसीबीने काही प्रवाशांच्या सामानातून ड्रग्स जप्त केलं असून त्यांना जहाजातून उतरवलं आहे. त्यामुळे उशिर होत असून त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे.
आर्यन याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आर्यनचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचे व्हॉट्सअॅप चॅटही तपासले जात आहेत. रेव्ह पार्टीबाबत या चॅटमध्ये काही चर्चा झाली होती का? या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का? आदी माहिती एनसीबी घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 60 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.
या क्रुझवरून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर प्रचंड ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त कर्मयात आलं आहे.
आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष शाहरूख खान काय प्रतिक्रिया देणार, याकडे लागले होते. शाहरुख खानची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेकांनी धावाधावही सुरु केली. मात्र, शाहरूख खान सध्या दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईत सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. शाहरुख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा मालक आहे. ही स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर उभी आहे. त्यामुळेच शाहरूख सध्या दुबईत असल्याचे कळते. दरम्यान, आर्यन खानवरील कारवाईनंतर पोलिसांचे कोणतेही पथक अद्याप शाहरूख खानच्या घरी गेलेले नाही. त्यामुळे आता शाहरुख खान मुंबईत कधी परतणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
संबंधित बातम्या :
शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…