बनावट जात प्रमाणपत्रामुळे नवनीत राणा पुन्हा संकटात, काय आहे कारण ?
न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गेल्या महिनाभरात हे दुसरे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
मुंबई : या ना त्या कारणाने सतत चर्चेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बोगस जात प्रमाणपत्र (Bogus Caste Certificate) प्रकरणी मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) बजावला आहे. नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या वडिलांनाही वॉरंट बजावण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरातील हे दुसरे वॉरंट आहे. नवनीत राणा यांनी राखीव कोट्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करत निवडणूक लढवली
नवनीत राणा यांचा मतदारसंघ असुसूचित जातीसाठी राखीव होता. आपण अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करत नवनीत राणा यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली.
लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये फेरफार करुन बोगस जातप्रमाणपत्र मिळवले
शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये फेरफार करुन राणा यांनी हे बोगस जात प्रमाणपत्र मिळवल्याचे आढळले. यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंग राम सिंग कुंडलेस या दोघांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिनाभरातील दुसऱ्यांदा बजावले वॉरंट
न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गेल्या महिनाभरात हे दुसरे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याआधीही राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
गेल्या वर्षी जात प्रमाणपत्र सादर करण्याचे दिले होते आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना त्यांचे जात प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश गेल्या वर्षी दिला होता. या आदेशाविरोधात नवनीत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.