भीषण! समोरासमोर धडकल्यानंतर दोन्ही एसटी बसचा पत्रा टराटरा फाटला
एसटी महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोरच जोरदार धडक
शशिकांत कासार, TV9 मराठी, पालघर : पालघरमध्ये (Palghar accident) दोन एसटी बसचा मंगळवारी भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये दोन्ही एसटी बस (ST Bus) समोरसमोरच धडकल्या. दोन्ही एसटी बसचं यात अतोनात नुकसान झालं. धक्कादायक बाब म्हणजे अपघातावेळी दोन्ही एसटी बसमध्ये प्रवासी होते. एकूण आठ प्रवासी या अपघातात जखमी झालेत. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर एसटी बसचा (ST Bus Accident) पत्रा कागद फाटल्याप्रमाणे फाटला होता.
नेमका कुठं अपघात?
विक्रमगड जव्हार रोडवरील वाळवंडा इथं हा अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक बस पालघरहून जव्हारकडे येत होती. तर दुसरी बस जव्हारकडून ठाण्याच्या दिशेने जात होती. मात्र वाळवंडा इथं या दोन्ही बस समोरासमोरच एकमेकांना जोरात धडकल्या आणि अपघात झाला.
या अपघातानंतर दोन्ही एसटी बसची समोरची काच तुटली होती. तर बसच्या दर्शनी भागाला मोठा फटका बसल्याचंही दिसलंय. अपघाताच्या समोर आलेल्या फोटोवरुन, धडकेवेळी दोन्ही बसचा वेग प्रचंड होता, अशी शक्यता वर्तवली जातेय.
पाहा अपघातानंतरचे फोटो
दोन एसटी बसचा भीषण अपघात! पालघरमधील घटना, अपघातानंतर काय अवस्था झालीये पाहा एसटीची… (फोटो – शशिकांत कासार, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी) pic.twitter.com/d5vQevLhvC
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 12, 2022
कशामुळे अपघात?
गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला, असं सांगितलं जातंय. जव्हार-ठाणे आगाराची बस जव्हार बस स्थानकातून सुटून जव्हारपासून 10 किलोमीटर अंतरावरच आली होती. तर पालघर-जव्हार ही एसटी बस जव्हारकडे येत असताना चालकाना बस नियंत्रित करण्यात चालकाला अपयश आल्यानं अपघात घडला.
भीषण अपघातामध्ये एकूण 8 प्रवाशांना जखम झाली. तर 6 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जव्हारच्या पतांगशहा कुटीर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. एसटी बसच्या या अपघातामुळे राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय.
मंगळवारी दुपारी झालेल्या या अपघातामुळे विक्रमगड-जव्हार मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. तर एसटी बसमधील प्रवाशांच्याही काळजाचा ठोका चुकला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर या अपघाताची नोंद करुन घेत खोळंबलेली वाहतूकही पूर्वपदावर आणली.