Sakinaka Murder : पतीचा खून करुन बॉडी बेडमध्ये लपवली! साकिनाका हत्याकांडाने हादारलं, पत्नीसह तिच्या प्रियकाराला अटक
Mumbai Sakinaka Murder News : अखेर नसीमचा काटा काढायचा, असं पत्नी रुबीनानं ठरवलं. तिने सैफसोबत नसीमच्या हत्येचा कट रचला.
मुंबई : पत्नीने आपल्या प्रियकराच्या (Boyfriend) साथीने आपल्याच पतीचा खून केला. पतीला संपवल्यानंतर (Husband murder) त्याचा मृतदेह घरातीलच बेडमध्ये लपवून ठेवला. ही खळबळजनक घटना मुंबईतील साकिनाका (Mumbai Sakinaka Crime News) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तसंच बेडमध्ये लपवलेला मृतदेहदेखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 22 वर्षांच्या पत्नीचे आणि तिच्या पतीचे सारखे खटके उडत होते. अखेर तिनेच प्रियकरासोबतच्या नात्याच्या आड येणाऱ्या पतीचा जीव घेतला. पत्नी आणि तिच्या प्रियकराने या हत्येचा कट रचला. पतीची हत्या करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या दोघांनाही अटक करण्यात आली असून पोलीस आता या खळबळजनक हत्याकांडप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नेमकं कळलं कसं?
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील साकिनाका इथं हे हत्याकांड घडलं. सोमवारी पोलिसांनी या मृतदेहाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी चोवीस तासांच्या आत सापळा रचून आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. नसीम खान या 23 वर्षांच्या टेलरची त्याच्याच पत्नीने हत्या केल्याचं समोर आलंय.
हत्येचा कट रचला
नसीन खान हा आपल्या पत्नीसोबत साकिनाका येथील खैरानी रोड इथं पत्नी रुबीना सोबत राहात होता. एका भाड्याच्या घरात हे दाम्पत्य वास्तव्यास होते. लग्नानंतर पती-पत्नींमध्ये सारखे वाद होत होते. नसीमची पत्नी रुबीना हिचे सैफ झुलफिकार फारुकी याच्याशी लग्नानंतरही प्रेमसंबंध होते. अखेर नसीमचा काटा काढायचा, असं पत्नी रुबीनानं ठरवलं. तिने सैफसोबत नसीमच्या हत्येचा कट रचला. पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह तिने भाड्याच्या घरातील बेडमध्ये लपवला.
पुरावा मिटवण्याचा प्रयत्न
पतीच्या हत्या करुन रुबिना त्याचा मोबाईल फोन सोबत घेऊन पसार झाली होती. नसीमच्या वडिलांनी जेव्हा आपल्या मुलाला फोन केला, तेव्हा रुबिनानं फोन उचलून नसीमला बरं वाटत नसल्याचं म्हणत बोलणं टाळलं. पण नंतर नसीमचा फोन स्विच ऑफ येऊ लागल्यानं वडिलांना संशय आला. दरम्यान, ज्या घरात नसीम राहत होता, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कुजलेल्या मृतदेहाचा दुर्गंध सतावू लागला होता.
अखेर सुगावा लागलाच
नसीमचे वडील अखेर त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा घराला कुलूप होतं. म्हणून मग पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा दार तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. नसीमचा मृतदेह त्यांना बेडमध्ये आढळून आला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पाहणी केली. रेल्वेस्टेशन, बस स्टॉप, आजूबाजूचा परिसर याचा आढावा घेतला. अखेर नसीमची पत्नी आणि तिच्या प्रियकाराला पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. कलम 302 आणि 201 प्रमाणे त्यांच्यावर आता खटला चालवला जाणार आहे.