आधी मालकिणीचा विश्वास जिंकला, मग डिजिटल लॉकर घेऊन पळाला !
6 सप्टेंबर 22 रोजी फिर्यादी शिखा आणि तिचा पती खाजगी कामासाठी बाहेर गेले होते. विजयने ही संधी साधली.
मुंबई / गोविंंद ठाकूर (प्रतिनिधी): मालकिणीच्या घरातून मौल्यवान दागिने (Jewellery) असलेले डिजिटल लॉकर (Digital Locker) घेऊन पलायन करणाऱ्या नोकराला कांदिवली समता नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे. चोरीचे सामान घेऊन जाताना चोरटा इमारतीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी बिहारमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कांदिवलीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घडली घटना
कांदिवली येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील विस्प्रिंग पाम इमारतीत शिखा नामक फिर्यादी महिला आपल्या पतीसह राहते. विजय हा शिखाच्या घरी नोकर म्हणून काम करत होता.
घरामध्ये नोकर म्हणून काम करत असल्याने शिखाच्या बेडरुममध्ये बेडला डिजिटल तिजोरी लावली आहे आणि यात सोने, हिरे आणि मोत्यांचे दागिने असल्याचे त्याला माहित होते.
6 सप्टेंबर 22 रोजी फिर्यादी शिखा आणि तिचा पती खाजगी कामासाठी बाहेर गेले होते. विजयने ही संधी साधली. लॉकरचा नंबर माहित नसल्याने आरोपीने स्क्रू ड्रायव्हर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी पलंगापासून वेगळी केली आणि तिजोरी घेऊन तो आपल्या गावी पळाला.
चोरटा इमारतीतील सीसीटीव्हीत कैद
शिखा आणि तिचा पती घरी परतल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ समता नगर पोलिसात धाव घेत चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विजय हातात सामान घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाला.
आरोपीने चोरलेल्या सोन्यापैकी काही सोने पाटणा येथील सोनाराजवळ विकले होते. तेथून मिळालेल्या पैशातून विजयने दुचाकी खरेदी केली होती. पोलिसांनी बिहारमधील फोर्ब्सगंज, अरेबिया येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत
तसेच आरोपीकडून दुचाकीसह, चोरलेले दागिने आणि तिजोरी हस्तगत केले आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.