मुंबई : एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. पण विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी अशी मागणी शिवसैनिकांनी करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. यासंदर्भात पोलीस कार्यवाही करत आहेत.
दहिसरमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रॅलीसाठी आले होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत या रॅलीत सहभागी झाले होते. मात्र, अज्ञात व्यक्तींनी रॅलीतील व्हिडीओ एडीट केला. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या या व्हिडीओमध्ये अश्लील मजकूर लिहून तो व्हायरल करण्यात आला. या व्हायरल व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली. शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तात्काळ तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोधही सुरू केला आहे.
हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. सध्या दहिसर पोलिसांनी तक्रार नोंदवून एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते रात्रभर दहिसर पोलीस ठाण्यात हजर होते. शीतल म्हात्रे यांनी मातोश्री नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून घाणेरडा मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.
या मॉर्फ व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे हा मध्यरात्री कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी त्यांनी पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. तसेच मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचं सांगितलं.
ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ अपलोड करून व्हायरल केल्याचं सांगत या प्रकरणी विनयभंगासारखा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यासाठी रात्रभर शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत एकाला अटक केली. इतरांचाही पोलीस शोध घेत आहेत.