लोकलमधून उतरताना महिला वकिलाचा विनयभंग, अखेर आरोपीला बेड्या
जोगेश्वरीच्या हार्बर रेल्वे स्थानकात 21 सप्टेंबर 2022 रोजी पीडित महिला वकील लोकलमधून उतरत असताना आरोपीने तिचा विनयभंग केला होता.
मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : मुंबईतील जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरताना महिला वकिला (Lawyer)चा विनयभंग (Molestation) करणाऱ्या आरोपीला बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. बिहारीलाल महावीर यादव असे अटक करण्यात आलेल्या 42 वर्षीय आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर बोरिवली जीआरपीच्या पथकाने आरोपीला महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळून अटक केली आहे.
लोकलमधून उतरताना महिलेचा विनयभंग
जोगेश्वरीच्या हार्बर रेल्वे स्थानकात 21 सप्टेंबर 2022 रोजी पीडित महिला वकील लोकलमधून उतरत असताना आरोपीने तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी महिलेने आरोपीविरोधात बोरीवली जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली होती.
महालक्ष्मी स्थानकातून आरोपीला अटक
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बोरिवली रेल्वे पोलीस चार वेगवेगळ्या टीम तयार करून विनयभंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते. सीसीटीव्हीमध्ये आरोपी कपडे काढून नग्न अवस्थेत फिरताना दिसत होता.
आरोपी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे जीआरपी पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर महालक्ष्मी स्थानकात आरोपीला जेरबंद करण्यात आले.
घटनेवेळी आरोपी नशेत
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता घटनेच्या वेळी तो खूप नशेत असल्याचे त्याने सांगितले. आरोपी मजुरीचे काम करतो. याआधीही आरोपीविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे.
कोणत्याही महिला डब्यात पुरुष प्रवासी आल्यास त्याची माहिती तात्काळ हेल्पलाइन क्रमांक 1512 वर द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी केले आहे.