अँटिलिया स्फोटक प्रकरण, बडतर्फ पोलीस सुनील मानेची जामिन याचिका फेटाळली
मानेसह मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर आठ जणांवर अँटिलिया बॉम्बस्फोट आणि व्यापारी मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा आरोप आहे. मानेने सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे.
मुंबई : अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील बडतर्फ मुंबई पोलीस अधिकारी एसीपी सुनील माने यांचा जामीन आणि मुक्तता अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. अँटेलिया प्रकरणी आरोपींच्या कृत्याबद्दल माहित नसल्याच्या सुनील मानेच्या युक्तीवादाबद्दल न्यायालय आत्ताच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नसल्याचे न्यायालयाने यावेळी नमूद केले. 25 फेब्रुवारी 2021 रोजी रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानाबाहेर जिलेटिन स्टिकने भरलेली कार ठेवण्यात आली होती.
काय म्हणाले न्यायालय?
“मानेचे कृत्य या क्षणी नाकारले जाऊ शकत नाही. मुख्य पुराव्याशिवाय, माने यांना काहीच माहिती नव्हती असा निष्कर्ष काढता येणार नाही,” असे विशेष एनआयए न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप सुनावणी सुरू झालेली नाही.
मानेसह आठ जण आरोपी
मानेसह मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतर आठ जणांवर अँटिलिया बॉम्बस्फोट आणि व्यापारी मनसुख हिरण मृत्यू प्रकरणाचा आरोप आहे. माने यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे.
24 मार्च 2021 रोजी जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा ते मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटचे प्रभारी होते. तेव्हापासून ते तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
मानेचा सहभाग असल्याचे स्पष्ट
न्यायाधीश पाटील यांनी फिर्यादीने मांडलेल्या खटल्यातील अनेक विधानांचा अभ्यास करत म्हटले आहे की, या प्रकरणात माने यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. फिर्यादीकडे असेलल्या पुराव्यांवरुन सचिन वाझेसह सह सुनील माने आरोपी असल्याचे दिसून येत आहे.
साक्षीदारांच्या जबाबाव्यतिरिक्त, फिर्यादीकडे आरोपींनी वापरलेल्या मोबाइल फोनच्या कॉल डिटेल रेकॉर्डसारखे पुरावे आहेत. साक्षीदारांच्या जबाबावरून मानेसोबत वाझेची उपस्थिती देखील दिसून येते, असे न्यायधीश पुढे म्हणाले.
आरोपपत्रातून असेही दिसून आले आहे की, “25 फेब्रुवारी 2021 रोजीच्या गुन्ह्यामुळे मनसुखची हत्या आरोपींनी केली होती. मनसुखची हत्या हे सुनियोजित कृत्य होते ज्यामध्ये उच्चस्तरीय गुन्हेगारी कटाचा समावेश होता, जो आरोपींनी दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने केला होता, असे न्यायधीशांनी म्हटले.