डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा रेल्वे पोलिसांच्या मदतीने सोन्यावर डल्ला, पोलिसांनी ‘असा’ उधळला डाव
नितीन पाटील हा सोने व्यापारी राजेंद्र पवार यांच्याकडे सोने डिलिव्हरी करण्याचे काम करत होता. 8 डिसेंबर रोजी नितीन पाटील हा मंगलोरहून अडीच किलो सोने घेऊन निघाला होता.
मुंबई : सोन्याची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने दोन लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने आपल्या कंपनीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेले सर्व सोने जप्त केले आहे. चोरी केलेल्या सोन्याची बाजारात किंमत 2 कोटी 47 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. नितीन पाटील असे मुख्य आरोपीचे तर प्रभाकर नाटेकर आणि विकास पवार अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत.
मंगलोरहून अडीच किलो सोने घेऊन निघाला होता
नितीन पाटील हा सोने व्यापारी राजेंद्र पवार यांच्याकडे सोने डिलिव्हरी करण्याचे काम करत होता. 8 डिसेंबर रोजी नितीन पाटील हा मंगलोरहून अडीच किलो सोने घेऊन निघाला होता.
काही वेळाने आपल्याला लुटल्याचे मालकाला सांगितले
मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद येत होता. काही तासांनी त्याने मालक राजेंद्र पवार यांना फोन केला आणि आपल्याला लुटले असून रेल्वे ट्रॅकवर टाकल्याचे सांगितले. यानंतर राजेंद्र पवार यांनी ट्रॉम्बे पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
पोलीस चौकशीत आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
ट्रॉम्बे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत नितीन पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी नितीनची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 4 किलो सोने मित्रांच्या मदतीने लुटल्याचे त्याने सांगितले.
सोने लुटून गावी नेले
आपले गावचे मित्र आणि ठाणे लोहमार्ग पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या प्रभाकर युवराज नाटेकर आणि त्याचा पोलीस मित्र विकास भीमा पवार यांनी एकत्र येऊन हा कट रचला आणि ते सोने सांगलीला त्यांच्या गावी नेले. मालकाकडे लुटीचा बनाव केल्याचे नितीनने पोलीस चौकशीत कबूल केले. पोलिसांनी या तिघांना ही अटक केली असून सर्व चोरीस गेलेले सोने जप्त केले आहे.