Jewelers Fraud : एस कुमार ज्वेलर्स फसवणूक प्रकरण, आणखी दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक
व्यापाऱ्यांचे एकूण 4 कोटी 22 लाख 74 हजार 270 रुपये पिल्लईकडून येणे बाकी होते. पिल्लईने व्यापाऱ्यांचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. तसेच भारतातील सर्व 12 शोरुम्स अचानक बंद करुन त्याने पलायन केले.
मुंबई : एस कुमार ज्वेलर्स फसवणूक (Fraud) प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज आणखी दोन आरोपींना अटक (Arrest) केले आहे. पिल्लई यांच्या एस कुमार ज्वेलर्स या कंपनीत मॅनेजर (Manager) म्हणून काम करणाऱ्या जोस चुमर आणि त्याची पत्नी सोजी चुमर यांना केरळमध्ये जाऊन पोलिसांनी अटक केली आहे. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या एस कुमार ज्वेलर्सचा मालक श्रीकुमार पिल्लई (68) यांना आधीच अटक करण्यात आली होती. श्रीकुमार पिल्लई याच्या अटकेवेळी एल टी मार्ग पोलिसांनी 2 कोटी रोख रक्कम आणि BMW गाडी जप्त केली होती. आरोपी श्रीकुमार पिल्लईने मुंबईतल्या काही व्यावसायिकांडून 4 कोटी 22 लाख 74 हजार रुपयांचे सोन्याचे दागिनेन घेऊन पळ काढला होता. भारतामध्ये त्याची 12 सोन्याच्या दुकानं होती ती अचानक बंद करून तो फरार झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.
व्यापाऱ्यांची फसवणुकीत एस.कुमार ज्वेलर्सचा केरळमधील मॅनेजर जोस चुमर आणि त्याची पत्नी सोजी चुमर यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी केरळमधून मॅनेजर आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण ?
आरोपी श्रीकुमार पिल्लई हा भारतातील मोठा सोने व्यापारी आहे. त्याची एस. कुमार ज्वेलर्स आणि एस. कुमार गोल्ड अॅण्ड डायमंड नावाने सोन्याची दुकाने आहेत. भारतामध्ये विविध ठिकाणी पिल्लई याची 12 दुकाने आहेत. मुंबईतील झवेरी बाजारातील काही सोने व्यापाऱ्यांसोबत 2020 ते 2021 मध्ये सोन्याच्या दागिन्यांचा होलसेल खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु होता. पिल्लईने या व्यापाऱ्यांकडून डिसेंबर 2020 पासून सोन्याचे दागिने खरेदी केले होते. मात्र या दागिन्यांचे पैसे देण्यास तो टाळाटाळ करत होता. व्यापाऱ्यांचे एकूण 4 कोटी 22 लाख 74 हजार 270 रुपये पिल्लईकडून येणे बाकी होते. पिल्लईने व्यापाऱ्यांचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. तसेच भारतातील सर्व 12 शोरुम्स अचानक बंद करुन त्याने पलायन केले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिल्लई विरोधात सदर व्यापाऱ्यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी एल.टी. मार्ग पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन एल.टी.मार्ग पोलिसांनी पिल्लई विरोधात कलम 409, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. तपासादरम्यान, पिल्लई हा डोंबिवली पूर्वेला मानपाडा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचत पिल्लई याला डोंबिवलीतून अटक केले. यावेळी आरोपीच्या ताब्यातील बीएमडब्लू कारची तपासणी केली असता कारमध्ये 2 कोटी 9 लाख रुपयांची रोकड सापडली. पिल्लई याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने आणखी किती व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. (Two more arrested by Mumbai Police in S Kumar Jewelers fraud case)