Video : You Tuber महिलेच्या छेडछाडीचा मुंबईतील लाईव्ह व्हिडीओ समोर!
दक्षिण कोरीयातील युट्युब महिलेसोबत मुंबईच्या खारमध्ये जे घडलं, ते धक्कादायक होतं
मुंबई : मुंबईच्या खार परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. दक्षिण कोरियातून मुंबईत आलेल्या युट्युबर महिलेची एका तरुणाने छेड काढली. छेडछाडीचा हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या प्रकरणी खार पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. सदर घटनेप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई ही मुलींसाठी सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. मात्र गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी मुंबईतही मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
नेमकं काय घडलं?
खार परिसरात एक महिला व्हिडीओ काढत होती. ही महिला युट्युबर असल्याची माहिती समोर आलीय. या व्हिडीओ दरम्यान ही महिला एका तरुणाला प्रश्न विचारत होती. ही महिला दक्षिण कोरियातून आली असल्याचंही बोललं जातंय.
सदर महिलेने व्हिडीओ दरम्यान, एका तरुणाला प्रश्न विचारले. त्यावेळी तरुणाने या महिलेसोबत अजब चाळे करण्याचा प्रयत्न केला. तसंच तिच्यावर जबरदस्ती करतानाही दिसून आला. या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
युट्युब महिलेला आपल्या दुचाकीवर बसून घेऊन जाण्यासाठी तरुण प्रयत्न करताना लाईव्ह व्हिडीओत कैद झाला आहे. त्यानंतर महिलेनं नकार दिल्यानंतरही तो तिच्या मागे लागला होता. युट्युब महिनेसोबत लाईव्ह व्हिडीओमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर आता या तरुणाला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंधेरीतही एक अशीच भयंकर घटना उघडकीस आली होती. युकेतून कामानिमित्त आलेल्या एका महिलेच्या समोर कार चालकाने हस्तमैथुन केल्याचा प्रकार घडला होता. या महिलेनं अंधेरी पोलिसात या प्रकरणी तक्रारही दिली होती. त्यानंतर चालकाला अटक देखील करण्यात आली होती.
आता दुसऱ्यांना अशाच प्रकारही छेडछाडीची घटना समोर आल्यानं परदेशातून मुंबईत येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी आता खार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान,सोशल मीडियात या घटनेच्या लाईव्ह व्हिडीओवरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.