Mumbai Crime : नव्या कारचा आनंद ठरला क्षणभंगुर, मुलगा मित्रासोबत कार चालवायला गेला पण..
ठाणे जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कल्याण बदलापूर महामार्गावर कार झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात...
ठाणे | 19 ऑक्टोबर 2023 : राज्यातील ठाणे जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास झालेल्या कारचा भीषण अपघाता झाला. या अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुरूवारी सकाळी पोलिसांनी ही माहिती दिली. मृत्यूमुखी पडलेले दोनही तरूण हे उल्हासनगर मधील रहिवासी आहेत. भरधाव वेगाने कार चालवताना धडक बसून हा अपघात झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला.
आई-वडिलांना गिफ्ट मिळाली होती कार
पोलिसांच्या सांगण्यानुसार, या कारमधील एका मुलाच्या आई-वडिलांना ही कार गिफ्ट मिळाली होती. नवी कार घरी आल्यामुळे सगळेच खूप खुश होते. त्यांचा १७ वर्षांचा मुलगा कार चालवण्यासाठी बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचा १८ वर्षांचा एक मित्रही कारमध्ये होता. कल्याण बदलापूर महामार्गावर ते भरधाव वेगाने कार चालवत होते. त्याचवेळी कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार एका झाडाला जाऊन धडकली. कार चालवायला जाण्यापूर्वी मुलाने आई-वडिलांची परवानगी घेतली होती की नाही, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही
या अपघातात दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेत त्यांना कारमधून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या संपूर्ण घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होते. अशा घटनांमधून धडा शिकत यापुढे बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगाने गाडी चालवू नका असा सल्ला पोलिसांतर्फे देण्यात आला आहे.
रस्ते अपघातात जुळ्या मुलांचा मृत्यू, आई-वडील गंभीर जखमी
पुण्यातही रस्ते अपघाताची एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील विश्रांतीवाडी चौकात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एका पेट्रोल टँकरने बाईकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यामुळे बाईकवरील कुटुंब खाली कोसळलं आणि दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला. तर त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश झा ( वय ४०) हे त्यांची पत्नी आणि ३ वर्षांच्या जुळ्या मुलींसोबत बाईकवरून जात होते. विश्रांतीवाडी चौकात ते सिग्नलवर उभे होते. मात्र सिग्नलचा लाईट हिरवा होताच, मागून आलेल्या पेट्रोल टँकरची त्यांना जोरदार धडक बसली आणि ते चौघेही खाली कोसळले. या दुर्घटनेत जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर झा व त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.