Mumbai Crime : बनावट मूर्ती दाखवत व्यापाऱ्याला गंडवले, 43 लाखांची फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक
सोन्याची बनावट मूर्ती दाखवत ज्वेलर्सच्या मालकाला फसवत 43 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना 400 ते 500 सीसीटीव्हींचे फूटेज स्कॅन करावे लागले.
मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : सोन्याची बनावट मूर्ती दाखवत ज्वेलरची 43 लाख रुपयांची फसवणूक (cheating case) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका 29 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. या गुन्ह्याप्रकरणी त्या भामट्याला जेरबंद करण्यासाठी (acused arrested) पोलिसांना 400 ते 500 सीसीटीव्हींचे फूटेज (cctv footage) स्कॅन करावे लागले, अशी माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करत, त्या आरोपीला जेरबंद केलेच.
जितेंद्र भोपा असे (वय 29) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. त्याने ऑगस्ट महिन्यात कांदिवली येथे एका व्यापाऱ्याची फसवणूक केली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जितेंद्रला अटक केली असून या गुन्ह्यामध्ये त्याच्या पालकांचा तसेच इतर ६-७ अत्रात व्यक्तींच्या सहभागाबद्दल ते अधिक तपास करत आहेत.
काय घडलं त्या दुकानात ?
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात ऑगस्ट महिन्यात दोन इसम आले होते. त्यांच्याकडे सोन्याची एक प्राचीन मूर्ती आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच ती मूर्ती विकण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. ज्वेर्लसच्या मालकाने त्या मूर्तीची पाहणी केल्यानंतर ती मूर्ती खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्या प्राचीन मूर्तीच्या बदल्यात त्या दुकानदाराने त्या दोघांनाही रोख रक्कम आणि काही दागिन्यांच्या स्वरूपात एकूण 43 लाखांचे पेमेंट केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मात्र सोन्याची ती मूर्ती बनावट असल्याचे त्या दुकनादाराला अवघ्या काही दिवसांमध्ये लक्षत आले आणि त्याने पोलिसांत धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने मुंबई आणि राजस्थानमधील विविध ठिकाणांचे सुमारे 400 ते 500 सीसीटीव्हींचे फुटेज स्कॅन केले. सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केल्यानंतर अखेर आरोपीला अटक करण्यात यश मिळाले, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक
दरम्यान, दुसऱ्या एका गुन्ह्याची घटना पालघर येथून उघडकीस आली आहे. सोमवारी पालघर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला पालघरमधील एका घरातून 3.62 लाख रुपयांचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
25 ऑगस्ट रोजी घरात कोणीच नसल्याचे पाहून ती संधी साधत घरफोडी करण्यात आली होती. “आरोपींनी खिडकीची लोखंडी जाळी कापून घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचे दागिने लुटून पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक करत 3.16 लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,” असे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले.