वृद्ध महिला फेरफटका मारत होती, पोलिसाने सांगितले दागिने काढून ठेव, मग…
हल्ली जेष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. रस्त्याने एकटे जाणाऱ्या किंवा घरात एकट्या असणाऱ्या महिलांना लुटण्याच्या घटना घडत आहेत.
मुंबई : हल्ली जेष्ठ नागरिकांना टार्गेट करुन लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विविध मार्गांनी जेष्ठ नागरिकांना फसवण्याचे प्रकार उघडकीस येत आहे. अशीच एक फसवणुकीची घटना सांताक्रुझमधील वाकोला परिसरात घडली आहे. तोतया पोलिसाने महिलेला पावणेदोन लाखाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. याआधीही या परिसरात अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
मंदिरातून घरी चालली होती महिला
वाकोला परिसरात अंजना शामजी सावला या महिला गुरुवारी सकाळी मंदिरातून घरी चालल्या होत्या. यावेळी एक इसम त्यांच्यासमोर आला आणि त्याने आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली. या परिसरात चोर आणि चैन स्नॅचर्सचा सुळसुळाट असून, तुमच्या मौल्यवान वस्तू माझ्या ताब्यात द्या, सुरक्षित राहतील असे सांगितले. सुरवातीला महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही.
पावणे दोन लाखाचे दागिने लुटून पसार
मात्र त्याचवेळी दुसरा व्यक्ती तेथे आला आणि त्याने आपली सोनसाखळी काढून पोलिसाकडे दिली. यामुळे महिलेलाही विश्वास वाटला आणि तिने आपले 1.75 लाखाचे दागिने काढून तोतया पोलिसाकडे दिले. आरोपीने ते दागिने एका लिफाफ्यात टाकले आणि बॅगेत टाकले. रस्ता ओलांडल्यानंतर दागिने परत देईल असे सांगितले. यानंतर आरोपी मोटारसायकलवर बसला आणि निघून गेला. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.