आधी पब्जी गेमच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करायचा, मग आक्षेपार्ह फोटोंद्वारे ब्लॅकमेल करायचा !
पब्जी गेम खेळणं महिलांना चांगलेच महागात पडले आहे. पब्जी गेमच्या माध्यमातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मुंबई : अहमदनगर येथील एका तरुणीला पब्जी गेमच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते. त्याला काही तास उलटत नाही, तोच मुंबईमध्ये आणखी एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. महिलांशी पब्जीच्या माध्यमातून मैत्रीचे सूत जुळवले. मग महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी जवळीक साधली आणि त्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढले. त्यानंतर त्याच फोटोच्या आधारे महिलांना ब्लॅकमेलिंग सुरु केले. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. जस्सू सिंग उर्फ कालुराम(24) असे त्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे.
अनेक महिलांशी साधली जवळीक
आरोपी जस्सू सिंगने महिलांना पब्जीच्या जाळ्यात खेचण्याचा प्लान आखला होता. या कटात त्याने सुरुवातीला महिलांशी घट्ट मैत्री करायची आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे आक्षेपार्ह फोटोज मिळवण्याचा चंग बांधला होता. त्यानुसार त्याने केवळ एक-दोन नव्हे, तर अनेक महिलांशी जवळीक साधली होती. त्याने महिलांसोबत पब्जी खेळताना मैत्री केली होती. नंतर तो इन्स्टाग्रामवर कनेक्ट झाला आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तो प्रत्यक्ष भेटल्यामुळे महिलांना त्याच्याबाबत कुठलाही संशय आला नव्हता. महिलांचा आपल्यावर विश्वास बसल्याचे हेरून जस्सूने त्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे मिळवली होती. त्याच छायाचित्रांद्वारे नंतर त्याने त्यांना ब्लॅकमेल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक
आरोपी जस्सू याने पब्जी गेम खेळण्यासाठी शाळा सोडल्याचे पोलीस चौकशीदरम्यान सांगितले. त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात खेचले होते, मात्र अनेक दिवस त्याच्या गैरकृत्याचा कुणाला अंदाज आला नव्हता. एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा आयपी अॅड्रेस शोधला आणि त्याद्वारे त्याला अटक करण्यात आली. तक्रारदार तरुणीला आरोपीने लग्नाचे वचनही दिले होते. मात्र केवळ फसवणूक आणि ब्लॅकमेलचे उद्दिष्ट ठेवलेल्या जस्सूने नंतर आपला शब्द पाळला नाही.