Mumbai Crime : आधी बॅरिकेडला जोरदार धडक, नंतर ड्युटीवरील जवानालाच उडवलं, 19 वर्षांचा चालक ताब्यात
भरधाव वेगाने आलेल्या या कारची आधी एका प्लास्टिकच्या जोरदार धडक बसली. मात्र त्यानंतरही कारचा वेग कमी झाला नाही. चालकाने गाडी तशीच वेगात पुढे नेली आणि ड्युटीवर तैनात असलेल्या जवानाला उडवलं. या घटनेत ते गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : शहरात गुन्ह्यांच्या, बेदरकारपणे गाड्या चालवून अपघाताच्या (accident) घटना वाढतच चालल्या आहेत. हातात गाडी आली की लोकांना वेगाची मर्यादा पाळायचं भानच रहात नाही. याच वृत्तीमुळे अनेकांचे अपघात होतात, काहींची घर कायमची उद्धवस्त होतात. अशीच एक भरधाव वेगामुळे झालेल्या दुर्दैवी अपघाताची घटना उघडकीस आली आहे. मुंबई विमानतळावर एका भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू (BMW) कारने ड्युटीवर तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला (car hit cisf jawan) धडक दिली.
याप्रकरणी हृदय कवर या अवघ्या 19 वर्षांच्या तरूणाविरोधात सहार पोलिस स्टेशनमध्ये रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. या अपघाता गंभीर जखमी झालेला जवान सध्या आयसीयूमध्ये दाखल असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविावर 1 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. कॉन्स्टेबल राहूल शर्मा हे हायवेवरील सीआरपीएफ चेकपोस्ट क्रमांक 1 येथे नाकाबंदीच्या ड्युटीवर तैनात होते. पहाटेच्या सुमारास तेथे एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने आली. कारने आधी प्लास्टिकच्या बॅरीकेडला धडक दिली आणि त्यानंतर ती तशीच पुढे आली व कॉन्स्टेबल राहूल शर्मा यांना उडवले. या धडकेमुळे शर्मा हे धाडकन जमीनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डोकं आणि तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला.
हे पाहून त्यांच्या इतर सहाकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि शर्मा यांना उपचारांसाठी अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याचे समजते.
ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल
या अपघातास जबाबदार असलेल्या हृदय कवर या तरूण चालकाला ( वय १९) सहार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 279, 338 आणि मोटार वाहन कायदाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. गाडी चालवताना कारचालकाने मद्यपान केले होते का, याचाही तपास करण्यात येणार आहे.
