Mumbai Crime : आधी पेशंट बनून क्लिनिकमध्ये गेला, नंतर थेट गळ्यावर चाकूच ठेवला आणि…
डॉक्टरांच्या क्लिनीकमध्ये घुसून त्यांना चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आले. मात्र त्यानंतरआरोपीने त्यांना भावनिक आवाहन केले. आपल्या कृत्याचा खेद असल्याचेही सांगितले. पण हे दु:ख खरं होतं की फक्त नक्राश्रू ?
मुंबई | 23 सप्टेंबर 2023 : मला बरं वाटत नाहीये, जरा तपासता का असं सांगत आधी तो क्लिनीक मध्ये आला. डॉक्टरांनी तपासल्यानंतर धन्यवाद म्हणून, त्यांची फी देऊन बाहेर गेला पण अवघ्या काही क्षणात दार वाजवून परत आत आला. पिशवीतून काहीतरी काढत होता, आधी डॉक्टरांना वाटलं की तो शंका विचारायला आलाय, पण पुढल्याच क्षणी त्याच्या हातातील वस्तू पाहून डॉक्टर घाबरल्या. त्यांच्या गळ्यावरील चाकूच्या टोकाचा थंड स्पर्श काही सुचूच देईना. तो काय बोलत होता याकडेही त्यांना नीट लक्ष देता आले नाही. तेवढ्यात आरोपीने गळ्यातील चेन, पेंडट काढायला सांगितली. ती घेतली आणि तो वाऱ्याच्या वेगाने निघून गेला…
वाचूनच दम लागला ना, कपाळावर घामाचे थेंब आलेत का ? पुसून घ्या नीट आणि मोठ्ठा श्वास घेऊन पाणी पिऊन मग वाचा… वर जे वाचलंत ते काही रहस्यमय पुस्तकातलं वर्णन नाही की एखाद्या चित्रपटाची कथा नाही. हे सगळं अगदी खरखुरं घडलं आहे, अगदी खरं. आणि तेही मुंबईतील पेडर रोडसारख्या पॉश एरियात, तिथेच हा गुन्हा घडला आहे.
मुंबईतील उच्चभ्रूंचा इलाका समजल्या जाणाऱ्या पेडर रोडवरील एका इमारतीमध्ये डॉक्टरांच्या क्लिनीकमध्ये घुसून त्यांचे सोन्याचे दागिने चोरण्याचत आल्याची घटना घडली आहे. पण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या आरोपीला अटक केली आहे. अर्जुन सोनकर असे त्याचे नाव असून तो अवघ्या 23 वर्षांचा आहे. सध्या वरळीचा रहिवासी असलेला अर्जुन हा फूड डिलीव्हरी ॲपसाठी फूड डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतोय. मग हे काम करताना अचानक चोरी करायला का गेला बरं हा ? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण गुन्हा करण्यासाठी काय मानसिकता असते, अचानक अस का करावंस वाटतं हे तेवढंच गुंतागुंतीच आहे ना.
असो या मूळ गुन्ह्याकडे वळूया. तर आरोपी अर्जुन हा मूळचा उत्तर प्रदेशमधील गोंडा इथला रहिवासी आहे. याच वर्षी मे महिन्यात ते फूड डिलीव्हरी ॲपसाठी काम करायला लागला. तोच 70 वर्षांच्या डॉ. मंदाकिनी पिरांकर यांच्या क्लिनिकमध्ये पेशंट बनून गेला आणि त्यांना लुटून आला. पिरांकर या गेल्या 25 वर्षांपासून एक अन्य महिला डॉक्टसोबत क्लिनीक चालवतात.
लुटीसाठी बनला खोटा-खोटा पेशंट
लुटीची ही संपूर्ण घटना 21 सप्टेंबरला घडली .आरोपी अर्जन सोनकर हा पीडित डॉक्टर मंदाकिनी पिरांकर यांच्या क्लिनीकमध्ये गेला आणि बरं वाटत नाहीये असं त्याने सांगितलं. आपलं नाव अविनाश पासवान असल्याचं त्याने खोटंच सांगितलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि ब्लड प्रेशर लो झालंय असं सांगत डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल होण्याच सल्ला दिला. त्याने डॉक्टरांची फी दिली आणि धन्यवाद म्हणून बाहेर पडला.
अचानक मानेवर ठेवला चाकू
डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर काही सेकंदांनी तो पुन्हा आतमध्ये आला. त्याने कापडी पिशवीतून एक चाकू काढला आणि महिला डॉक्टरांच्या गळ्यावर ठेवला आणि त्यांना गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांना तिची सोन्याची चेन आणि अडीच तोळ्याचे पेंडट असा एकूण लाखभर रुपयांचा माल काढून देण्यास सांगितले. पळून जाण्यापूर्वी त्याने डॉक्टरांना धक्काबुक्की देखील केली.
पोलिसांनी आरोपीला केली अटक
सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी श्रीनिवास दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” आरोपीने आपली बॅग तिथेच सोडली. त्यामध्ये एका डायरीत त्याच्या हस्तलिखीत नोट्स होत्या. मला हे करायचे नव्हते आणि या कृत्याचा आपल्याला खेद वाटतो, असेही त्याने त्यात लिहीले होते. अशा नोट्स सोडून, भावनात्मक आवाहन केल्याने फिर्यादी कदाचित पोलिसांत जाणार नाहीत, असे त्याला वाटले असावे ” असे पोलिसांनी सांगितले.
तो बनावट रुग्ण म्हणून आत गेला होता, डॉक्टरांना लुटण्याचा त्याचा हेतू होता. आम्ही त्याला अटक केली असली तरी लुटीचा माला अद्याप मिळालेला नाही. आम्ही त्याच्याकडून आत्तापर्यंत 16 हजार रुपयांची रोख रक्कम, एक चाकू, स्विगीचा टी-शर्ट, डायरी असा माल जप्त केले आहे. पळून जाण्यापूर्वी त्याने हे सर्व क्लिनिकमध्ये सोडले होते. दरम्यान या लुटीप्रकरणी आरोपी सोनकरला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.