मुंबईत आणखी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हॉटेलवर छापेमारी करत चार महिलांची सुटका
मुंबई पोलिसांनी आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा छापेमारी करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.
गोविंद ठाकूर, मुंबई : मुंबईत आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. विट्स इंटरनॅशनल या फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा टाकत गुन्हे शाखेने चार महिलांची सुटका केली आहे. चौघींमध्ये दोन रशियन महिलांचा समावेश आहे. खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि समाजसेवा शाखेने संयुक्त कारवाई करत सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. मागील आठ दिवसात दोन सेक्स रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील अधिकारी अरुण थोरात यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
चार आरोपींना अटक करत ड्रग्जही हस्तगत
परदेशी महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या दोन दलालांसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन दलालांकडून प्रत्येकी 4 ग्रॅम मॅफेड्रॉन आणि 8 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींविरोधात कलम 370(3), 465, 471, 34 भा.दं.वि. सह कलम 4, 5 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमसह कलम 8(क), 22(ब), 29 एनडीपीएस कायदा 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने चारही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची छापेमारी
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात यांना अंधेरी मरोळ येथील विट्स इंटरनॅशनल हॉटेलमध्ये परदेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस गुन्हे शाखा, खंडणीविरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि समाजसेवा शाखा यांनी संयुक्त कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. परदेशी महिलांचे बनावट भारतीय पासपोर्टही बनवण्यात आले होते.